रत्नागिरी : लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Election 2024) पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तेढ सध्या निर्माण झालाय. तसेच जागावाटपावरुन बराच संभ्रम देखील असल्याचं पाहायला मिळतंय. पण महायुतीमध्ये (Mahayuti) अद्यापही जागावाटपावरुन कोणतीही प्राथमिक चर्चा सुरु झाली नसल्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar Group) गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केलाय. तसेच 14 जानेवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती देखील यावेळी सुनील तटकरे यांनी दिलीये.
महायुतीमधील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते या बैठकांना उपस्थित राहणार असल्याचं देखील सुनील तटकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर एकाच दिवशी राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये सभांचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये. तसेच फेब्रुवारी महिन्यात महायुतीचा कोकण मेळावा होईल. त्यावेळी जागावाटपाच्या संदर्भात चर्चा होणार असल्याची शक्यता आहे, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
आम्ही 45 प्लस हे उद्दिष्टे ठेवून लोकसभा लढणार - सुनील तटकरे
आम्ही 45 प्लस जागा लढवण्याचं उद्दिष्ट ठेवूनच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं. दरम्यान राज्यात एकाच दिवशी होणाऱ्या महायुतीच्या बैठकांसदर्भात मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं. पुढे त्यांनी म्हटलं की, या बैठकांना तिन्ही पक्षांतील प्रमुख नेते, प्रदेशाध्यक्ष हे संबंधित जिल्ह्यांमध्ये उपस्थित राहतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळेला बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे. जागावाटपाची चर्चा ही यथावकाश आणि योग्य वेळी करण्यात येईलच. पण आम्ही एका गोष्टीवर ठाम आहोत की आम्ही 45 प्लस उद्दिष्ट ठरवूनच लोकसभा निवडणूक लढवणार आहोत.
अजित पवारांकडून चार जागांवर दावा
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी चार जागांवर दावा केला होता. त्यामध्ये मावळ, शिरुर, बारामती आणि रायगड या जागांचा समावेश आहे. तसेच या जागा शिंदे गटाकडूनच लढवण्यात येतील असं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीत देखील जागावाटपावरुन वादाची ठिणगी पडणार का हे आगामी काळात स्पष्ट होईलच. पण या जागावाटपाचं समिकरण सुटणार की याचा तेढ अजून निर्माण होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.