मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election)  सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यात जागा वाटप हा मुद्दा सर्वच पक्षात कळीचा ठरणार आहे.  महायुतीमध्ये (MahaYuti)  तर एका मतदार संघासाठी आतापासूनच संघर्ष सुरू झालाय आणि याला कारणीभूत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan)  ठरले आहेत. 


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत असणारा हा मतदारसंघ आहे. कधी वादामुळे चर्चेत असतो तर कधी विविध प्रकल्पावरून कायमच चर्चेत असतो.  आता पुन्हा एकदा हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलाय आणि तोही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर... मागील दहा वर्षे उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावरून आता भाजप आणि शिंदे गटात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.


उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत मैदानात उतरण्याची शक्यता


उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत  हे या मतदारसंघातून लोकसभेची तयारी करत असतानाच आता भाजपने देखील या मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत भाजप आहे. 


रविंद्र चव्हाण यांचे नाव  पुढे का आले? 



  • रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख

  • पक्षाने दिलेली जबाबदारी ते नेहमीच पार पाडतात अशी त्यांची पक्षात प्रतिमा 

  • जेव्हापासून त्यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलीय तेव्हापासून फक्त सिंधुदुर्ग जिल्हाच नाही तर रत्नागिरीमध्ये देखील त्यांनी पक्ष वाढवण्याकडे विशेष भर दिलाय

  • भाजपला कोकणात आपली ताकद वाढवायची आहे.

  • याचसाठी भाजपने रविंद्र चव्हाण यांच्याकडे संपूर्ण कोकणात महत्वाची जबाबदारी दिलीय

  •  सगळयात महत्वाचे म्हणजे रविंद्र चव्हाण यांच्या नावाच्या चर्चेनंतर किरण सामंत यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.रविंद्र चव्हाण मला मोठ्या भावाप्रमाणे असल्याचे म्हणत त्यांना तिकीट दिल्यास मी त्यांचा जोराने प्रचार करेन असे सांगितले..


 या आधी श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून रविंद्र चव्हाण लढतील अशी चर्चा सुरू झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, चव्हाण यांनीच ते कल्याणमधून लढणार नसल्याचे स्पष्ट करून चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र आता रत्नागिरी-सिधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी रविंद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आलंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळेल, अशी आशा सामंत बांधूना होती. पण, आता अचानक भाजपचे रविंद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आल्याने या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेची ताकद असतानाही ही जागा भाजपला सोडण्यावरून महायुतीत ठिणगी पडू शकते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


हे ही वाचा :


Kiran Samant: किरण सामंत यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी मागितली, कामाला लागा; उदय सामंत यांचा कार्यकर्त्यांना आदेश