Ratnagiri News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) आणि भाजपचे नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात लढत आहे. पण एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार? याचे चित्र 4 जूनला स्पष्ट होणार आहे. त्यातच आता या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 14 टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे.


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 14 टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी 25 फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी 24 फेऱ्या, सावंतवाडी 22 फेऱ्या तर, कुडाळ मतदार संघात 20 फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे.


14 टेबलवर फेरीनिहाय मतमोजणी होणार


मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी सकाळी 8 वा. सुरु होणार आहे. टपाली मतदान मतमोजणीसह प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एकाच वेळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. चिपळूण विधानसभा मतदार संघात 336 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 345 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 25 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. राजापूरमध्ये 341 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 25 फेऱ्यांमध्ये मजमोजणी होणार आहे. कणकवली विधानसभा मतदार संघात 332 मतदान केंद्र असल्याने 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. कुडाळ विधानसभा मतदार संघात 278 मतदान केंद्र असल्याने 20 फेऱ्यांमध्ये तर, सावंतवाडी विधानसभा मतदार संघात 308 मतदान केंद्र असल्याने 22 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे.


मतमोजणी प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास निर्बंध


मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाही. याठिकाणी मोबाईल वापरावर भारत निवडणूक आयोगाने संपूर्णपणे निर्बंध घातला आहे. याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 


नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात चुरशीची लढत


रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात भाजपनं केलेला प्रचार आणि शिवसेनेचा तळागाळापर्यंत असलेला कार्यकर्ता यामुळे निवडणूक चुरशीची झाली. सुरुवातीला भाजप मागे पडतंय की काय असे वाटत असताना शेवटच्या काही दिवसांमध्ये गणितं बदलत असल्याचा सूर राजकीय अभ्यासकांनी लावला. दोन्ही बाजूने जोरदार, आरोप, प्रत्यारोप, प्रचार केले गेले. शेवटच्या दोन दिवसांमध्ये घरोघरी जाऊन वाटलेले पैसे हा देखील यावेळी कोकणात चर्चेचा विषय ठरला. सुरूवातीला विनायक राऊत यांना सोपं वाटलेलं गणित काहीसं बदलू लागलं. त्यामुळे नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात होणारी लढत ही चुरशीची असणार आहे.


आणखी वाचा 


Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या पराभवाला फक्त 'ही' एक गोष्ट ठरणार कारणीभूत; अनिल थत्तेंची सनसनाटी भविष्यवाणी