Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्हयाला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढलंय त्यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात सरासरी 157 मिमी तर एकूण 1413 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवसांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पुढील पाच दिवस दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यावर ताशी 40-50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे
मंडणगड 205.00 मिमी , दापोली 145.00 मिमी, खेड 74.00 मिमी, गुहागर 77.00 मिमी, चिपळूण 169.00 मिमी, संगमेश्वर 210.00 मिमी, रत्नागिरी 69.00 मिमी, राजापूर 122.00 मिमी,लांजा 342.00 मिमी.
भार्ली घाटात देखील दुपारी दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. खेड नगरपालिका क्षेत्रातील एकूण 37 कुटुंबातील 100 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेले आहेत. यापैकी नगरपालीका क्षेत्रातील आठ कुटुंबांना एल पी हायस्कूल येथे हलविण्यात आलेले आहे. खेड शहरातील मच्छीमार्केट मध्ये पुराचे पाणी आल्याने 8 व्यवसायीकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.
चिपळूण तालुक्यातील मौजे पेढे दुर्गवाडी व बौध्दवाडी येथील दरडप्रवण क्षेत्राजवळील चार कुटुंबे 30 व्यक्तींना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आली आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथील वाहतूक काल रात्रीपासून बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने (आंबडस –चिरणी) वाहतूक सुरु करण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील मौजे जवळेथर येथे दरड कोसळली असून तेथील व पूरग्रस्त भागातील चार कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मौजे खंडेवाडी येथील 29 कुटुंबे 120 व्यक्ती यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे
संबंधित बातम्या :
Maharashtra Rain : मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा