Vinayak Raut : मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेनेचे किमान 100 आमदार निवडून येतील असा विश्वास शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी व्यक्त केला. जे आमदार खरेदी विक्रीच्या बाजारात विकले गेलेत, त्यांची आम्हाला मुळीच चिंता नसल्याचा टोला देखील राऊत यांनी बंडखोरांना लगावला. बंडखोरांच्या विरोधात आणि भाजपच्या कपट कारस्थाना विरोधात आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले. उदय सामंत किंवा दीपक केसरकर यांचा आयत्या बिळात नागोबाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश झालेला होता. त्यांच्यामुळं शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेनं त्यांना वाढवलेलं असल्याचे खासदार विनायक राऊत म्हणाले.
 
बंडखोरांना शिवसैनिक आहोत असं म्हणण्याचा अधिकार नाही
 
सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केल्यानंतर भाजपसोबत घरोबा करत सरकार स्थापन केले. त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर अनेक नेत्यांकडून मध्यावधी निवडणुका होणार असल्याची वक्तव्य केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे किमान 100 आमदार निवडून येतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. बंडखोर आमदारांची आम्हाला मुळीच चिंत नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, रत्नागिरीतील शिवसेनेच्या मेळाव्याला येण्याचा उदय सामंत यांना नैतिक अधिकार नाही. त्यांनी येऊही नये असे देखील खासदार राऊत म्हणाले. आम्ही शिवसैनिक आहोत असं म्हणण्याचा नैतिक अधिकार बंडखोरांना नाही. जर हिंमत असेल तर सांगा आम्ही भाजपवासी झालोय ते असा टोला देखील खासदार राऊतांनी लगावला.


हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्याव्यात : उद्धव ठाकरे


दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केलं आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून काल त्यांनी शिवसेना भवनमध्ये राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे या घटनेचा अपमान असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. ते पुढे म्हणाले की, आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर चुकत असेल, तर आपल्याला जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले होते.