Eknath Shinde Ratnagiri Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) एक दिवसाच्या रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या स्वागताची जोरदारी तयारी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. दरम्यान,राज्यात झालेल्या सत्तातरानंतर आणि शिवसेनेतील मोठ्या राजकीय बंडानंतर, फुटीनंतर होत असलेला दौरा महत्त्वाचा आहे. सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री मुंबईहून शासकीय हेलिकॉप्टरने रत्नागिरीला रवाना होती आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत रत्नागिरी विमानतळावर पोहोचतील.
मुख्यमंत्र्यांचा दिवसभर भरगच्च कार्यक्रम, संध्याकाळी सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असून दिवसभर त्यांचा भरगच्च असा कार्यक्रम देखील आहे. आपल्या दौऱ्याची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. रत्नागिरीतील एकदिवसीय दौऱ्यात मुख्यमंत्री विविध पदाधिकारी, संघटनेसोबत चर्चा करणार आहेत. जिल्ह्यातील कोट्यवधी कोटींच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर संध्याकाळी प्रमोद महाजन संकुलमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर रात्री ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
एकनाथ शिंदे कोकणातील रिफानरीबाबत भाष्य करणार?
मुख्य बाब म्हणजे यापूर्वी रद्द झालेल्या नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारे काही समर्थक आणि सध्या प्रस्तावित असलेल्या बारसू-सोलगाव इथले रिफायनरी विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील असणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या लोकांना भेटणार का? तसेच कोकणातील रिफायनरीबाबत मुख्यमंत्री काही भाष्य करणार का? याकडे देखील सर्वांचे कान आणि डोळे लागून असणार आहेत.
ठाकरे गट कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही : आमदार राजन साळवी
दरम्यान रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे नेते हजर राहणार नाहीत. कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेत ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव यांची नावं आहे. त्यामुळे फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते एकाच मंत्रावर येणार का याची उत्सुकता लागली होती. मात्र प्रोटोकॉल म्हणून आमचं नाव टाकलं असेल किंवा आम्हाला निमंत्रित केलं असेल, पण त्यांचा तो पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही उपस्थित राहणार नाही असं आमदार राजन साळवी यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी कामं मंजूर झाली, त्यांची आता उद्घाटनं होत आहेत. या कार्यक्रमांना जाणं हे आम्हाला बंधनकारक नाही, असंही राजन साळवी म्हणाले.