Ratnagiri : गोशाळा चालक भगवान कोकरे (Bhagwan Kokare) हे आज हजारो गुरे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa highway) सोडणार आहेत. खेड (Khed) तालुक्यातील लोटे MIDC तील गोशाळेच गेल्या नऊ दिवसापासून भगवान कोकरे यांचे आमरण उपोषण सुरु आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने ते नाराज आहेत. आज दुपारी चार वाजता मुंबई-गोवा महामार्गावर  गुरे सोडून स्वतः आत्मत्याग करणार असल्याचा इशाराही भगवान कोकरे यांनी दिला आहे.


उपोषणाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, कोकरेंचा आरोप


खेड तालुक्यातील लोटे midc तील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संथान गोशाळेच्या जागेच्या प्रश्नासबंधी गोशाळा संथापक भगवान कोकरे हे गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. अद्याप याबाबत कोणताही निर्णय झाला आहे.  उपोषणाकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे कोकरे म्हणाले. 


नेमकं प्रकरण काय?


रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्था संचालित गोशाळेची 2008 मध्ये स्थापना झाली. सुरुवातीला या गोशाळेमध्ये 40 ते 50 गाई म्हशींनी सुरुवात झाली होती. त्यानंतर आता जवळपास 1100 गुरांची संख्या झाली आहे. त्यामुळं आता गोशाळा चालवायची कशी? या गुरांच्या चाऱ्या पाण्यासाठी महिन्याला लागणारा 40 ते 45 हजार रुपयांचा खर्च आणायचा कोठून? असा प्रश्न समोर असतानाही गेली 15 वर्ष या गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे महाराज हे या गाईंना कीर्तन सेवा करुन सांभाळत आहेत. या कीर्तन सेवेतून येणारे पैसे आणि लोकांकडून येणारी मदत याच्यावरती आजपर्यंत या गाईंचा चारा पाण्याचा प्रश्न सुटत होता. मात्र गेली तीन वर्ष ही गोशाळा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.


गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर झाली होती गोशळेची चौकशी


गुहागर-खेड मतदारसंघात गेल्या काही वर्षांमध्ये होणाऱ्या गो तस्करी, गो अवैद्य वाहतूक या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळं या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सध्याचे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दोन वर्षांपूर्वी अधिवेशनात या घडणाऱ्या प्रकारांची लक्षवेधी मांडली होती. त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि दोषींवरती कारवाई व्हावी अशी ही मागणी केली होती. या मागणीनंतर त्या वेळचे तत्कालीन गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या मतदारसंघात खेड एमआयडीसीमध्ये असलेल्या गोशाळेची चौकशी झाली परंतू, अहवाल अजूनही सर्वांसमोर आलेला नाही. काही काळानंतर यामध्ये राजकीय वातावरण किंवा राजकीय रंग पाहायला मिळाला. गोशाळा असलेल्या बाजूच्या सोन गावातल्या रहिवाशांनी या गोशाळेचे मलमूत्र आणि सांडपाणी गावच्या ओढ्यामध्ये येऊन या ओढ्यावरती आधारित असलेल्या विहिरी आणि बोरवेलचे पाणी दूषित होते. त्यामुळं आम्हाला आजार येतात अशी तक्रार संबंधित एमआयडीसी कार्यालयात केली. एवढेच नाही तर सोनगावचे रहिवाशी या एमआयडीसीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले. 


45 दिवसांमध्ये येथील गोशाळेला पर्यायी जागा देण्यात येईल असे प्रशासनाने म्हटले होते. तसेच गावकऱ्यांना लेखी निवेदनही दिले होते. त्यानंतर गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे यांनी प्रशासनाकडे दाद मागितली होती. जर गोशाळा या जागेवरुन हटवली तर या 1100 गुरांचे काय करायचे? यावरती प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही, म्हणून भगवान कोकरे यांनी दीड महिन्यापूर्वी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. उपोषणाला बसल्यानंतर चौथ्या दिवशी सध्याच्या सरकारमधले आमदार भरत गोगावले, माजी खासदार निलेश राणे, आमदार योगेश कदम आणि सध्याचे सरकारमधील शिवसेनेचे नेते रामदास कदम अशा विविध सरकारमधील लोकप्रतिनिधी नेत्यांनी आश्वासन दिले होते की ही गोशाळा आम्ही तोडू देणार नाही किंवा हटवून सुद्धा देणार नाही. उपोषण स्थगित झाल्यानंतर गोशाळा संस्थापक भगवान कोकरे यांनी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनाचा पाठपुरावा केला. प्रशासकीय फेऱ्या मारल्या तरीही जे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाला प्रशासनाकडून यश मिळत नव्हते. कोणत्याही कागदपत्रांवर लेखी प्रशासकीय अधिकारी देत नव्हते. त्यामुळं कोकरे हे गेल्या नऊ  दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ratnagiri : कोकरे महाराजांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, लोटे MIDC गोशाळेतील गायींचा प्रश्न ऐरणीवर, वाचा नेमकं प्रकरण काय?