रत्नागिरी : विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर आता हालचाली देखील वाढताना दिसत आहेत. बालेकिल्ला असलेल्या कोकणात (Konkan) आता ठाकरे गटाने चाचपणी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीमध्ये झालेल्या दुहीनंतर अजित पवार यांना पाठिंबा दिलेल्या आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांच्याविरोधात उमेदवार निश्चितीवर भर सध्या ठाकरे देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या रोहन बने यांना पक्षाने कामाला लागा असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. शांत आणि संयमी अशी ओळख रोहन बने (Rohan Bane) यांची आहे. त्यामुळे शेखर निकमांसारख्या उमेदवाराविरोधात बनेंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. रोहन बने हे माजी आमदार सुभाष बने यांचे ज्येष्ठ पुत्र देखील आहेत. शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जिल्हाभरात राहिलेला चांगला संपर्क, अध्यक्षपदाचा कारकिर्दीत घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय, तसेच तरूण आणि वादात नसलेलं व्यक्तिमत्व म्हणून रोहन बने यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळेच रोहन बने यांना चिपळूण-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यास मोठी अडचण येणार नाही असं रत्नागिरी जिल्ह्यातील जाणकारांचं म्हणणं आहे. 


त्याचवेळी शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव देखील उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी तयार आहेत. एबीपी माझाशी फोनवरुन बोलताना तर नक्कीच अंगावर घेतले जाईल अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा आपली इच्छा बोलून दाखवलेली आहे. दरम्यान, त्याचवेळी ते आपला मुलगा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यासाठी गुहागर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील असल्याचं देखील बोललं जात आहे. तसेच काहीच दिवसांपूर्वी त्यांनी विक्रांतला गुहागरमधून उमेदवारी मिळणारच नाही अशी प्रतिक्रिया देखील माझाकडे दिली होती. त्यामुळे ठाकरे गट नेमकी काय भूमिका घेणार? कुणाला उमेदवारी देणार? याची चर्चा पुन्हा एकदा नव्यानं सुरु झाली आहे. 


जाधव चिपळूणसाठी इच्छुक?


दरम्यान, भास्कर जाधव हे चिपळूण-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं देखील जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पण, पक्ष याबाबत किती गंभीर आहे? याबाबत मात्र शंका आहे. अशावेळी शेखर निकम यांच्याविरोधात चिपळूण-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून रोहन बने यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने भास्कर जाधव यांना उमेदवारी मिळेल का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. पण, चिपळूणमधून आगामी विधानसभा लढण्याबाबत अद्याप तरी भास्कर जाधव यांनी उघडपणे आपले मत व्यक्त केलेले नाही. 


रत्नागिरीमधून साळवी पडले मागे?


दरम्यान, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांच्याविरोधात राजन साळवी यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. राजन साळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लागलेले बॅनर देखील चर्चेचा विषय ठरला होता. पण, साधारणपणे दहा दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या रत्नागिरी शहरातील मेळाव्यामध्ये खासदार विनायक राऊत यांना राजापूर-लांजा-साखरपा याच मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता उदय सामंत यांच्याविरोधात नेमका उमेदवार कोण? याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. अशावेळी भास्कर जाधव यांनी केलेलं वक्तव्य देखील महत्त्वाचे आहे. पण, सारी गणितं आगामी काळातील बदलत्या राजकारणावर अवलंबून असणार हे नक्की!