Ratnagiri News : कोकणचा (Konkan) हापूस आंबा (Alphonso Mango) जगात प्रसिद्ध. अगदी इंग्लंडच्या राणीने देखील हापूस आंब्याची चव चाखल्यानंतर ती त्याच्या प्रेमात पडली. पण याच हापूस समोर सध्या संकटांची मालिका उभी आहे. उशिराने आलेला मोहर, मग थ्रिप्स आणि तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आणि आता उष्माघातामुळे (Heat Stroke) फळगळ, यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.


हापूस आंब्यासमोर संकटांची मालिका


लांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरु झालेली थंडी यामुळे हापूस काहीसा उशिराने मोहरला. त्यानंतर देखील या मोहरावर थ्रिप्स आणि तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली. अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात का असेना हापूस हाताशी लागेल अशी आशा इथल्या शेतकऱ्यांना होती. पण सध्या वातावरणात उष्मा वाढला असून त्याचा परिणाम आता हापूसवर जाणवत आहे. कारण सध्या झालेल्या फळधारणापैकी जवळपास 75 टक्के हापूस हा गळून पडत आहे. परिणामी कोकणातला शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. अशा या परिस्थितीमध्ये तो मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे आता या वातावरण बदलाचा अभ्यास अभ्यासकांनी करावा आणि त्यातून किमान काय मार्ग असेल तर सुचवावा, अशी मागणी हा शेतकरी करत आहेत.


मे महिन्यात आंब्याची कमतरता भासेल : आंबा उत्पादक शेतकरी


बदलत्या हवामानामुळे (Climate Change) हापूस आंब्याला फटका बसत आहे. रोगामुळे नाईलाजाने औषधांची फवारणी करावी लागते. मार्चमध्ये लोकांकडे आंबा होता, तो जास्तीत जास्त एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मिळेल. त्यानंतर आणि मे महिन्यात आंब्याची कमतरता भासेल. मागच्या मोहरावर अवलंबून होतो, पण त्यावरही वातावरण बदलाचा परिणाम झाला आहे. या वातावरण बदलाचा आंब्यावर होणाऱ्या परिणामांबाबत अभ्यासकांनी संशोधन करावं आणि त्यातून किमान काय मार्ग असेल तर सुचवावा, अशी प्रतिक्रिया हापूस उत्पादक शेतकरी प्रदीप सावंत यांनी दिली.


सन बर्नमुळे फळगळ


फळांचा राजा कोकणचा हापूस आंब्याला सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे. कोकणात दिवसा तापमानात झालेल्या वाढीमुळे उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे. बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. सन बर्न झालेले हे आंबे बागायतदारांना फेकून देण्याशिवाय पर्याय नाही.


हेही पाहा


Alphonso Mango : हापूस आंब्याला उष्माघाताचा फटका, आंब्यावर डाग उठल्याने फळगळ