रत्नागिरी : "आपल्या लग्नाला घरच्यांची परवानगी मिळाली असल्याचं त्यानं मला सांगितलं. मी त्याच्यासाठी घरदार सोडून पंजाबहून रत्नागिरीला आले. त्यानं मला रत्नागिरीला येण्यासाठी पैसे देखील पाठवले. प्रवासादरम्यान तुझं सीम कार्ड फेकून दे असंदेखील सांगितलं. त्याच्या प्रेमासाठी मी तेदेखील केलं. त्यानंतर कुणाचा तरी हॉटस्पॉट घेऊन त्याच्याशी संपर्क करत राहिले. मोठा प्रवास करत रत्नागिरी स्टेशनला उतरले. त्यानं मला तुला नेण्यासाठी रत्नागिरी स्टेशनला गाडी पाठवत असल्याचं सांगितलं. पण स्टेशनला उतरल्यानंतर गाडी देखील दिसली नाही."


मी त्याला सातत्यानं संपर्क करत राहिले. पण, प्रतिसाद मिळत नव्हता. इन्स्टावर मेसेज केले. व्हॉईस कॉल केले. पण प्रतिसाद नाही. अखेर एक कॉल उचलला गेला. पण कुणीतरी मुलगी बोलत होती. हा नंबर हर्षकुमार यादवचा नसून तो रिझानचा आहे. पुन्हा या नंबरवर कॉल करायचा नाही असं सांगत समोरच्या मुलीनं फोन ठेवला. माझ्या पायाखालची वाळू सरकरली. काय करू कळेना. अखेर नोकरी करून पैसे कमवायचे आणि पुन्हा घरी परतायचं या इराद्यानं दुकानांमध्ये नोकरीचा शोध सुरू केला. त्यावेळी माबोईल दुकानदारामध्ये नोकरी मागत असताना त्यांना सारी गोष्ट सांगितली. त्यांनी पोलिसांना बोलावलं आणि मला मोठी मदत झाली. 


मी आता परत घरी जात असल्याचं समाधान आहे. पुन्हा कधीच अशा प्रकारे फसणार नाही. मला शिकून मोठं व्हायचं आहे. न्यायमूर्ती बनायचं आहे. आई- बाबांचं नाव मोठं करायचं आहे.


ही आपबीती आहे पंजाबमधील बारावीत शिकणाऱ्या तरूणीची. तिनं सांगितलेला हा सारा घटनाक्रम ऐकल्यानंतर मन सुन्न होतं. समाजमाध्यमांचे दुरुपयोग आणि तरूणी पिढीच्या अविचारी पावलांबद्दल चीड निर्माण करते. पण प्रेमासाठी पंजाबमधील मोहालीहून कोकण अर्थात रत्नागिरी गाठलेल्या तरूणीबाबत उद्भवलेला प्रसंग तसा बाका. पण, मोबाईल दुकानरामुळे तरूणी आज सुखरूप घरी गेली. साधारणपणे दोन ते तीन दिवसांपूर्वी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पहाटेच्या ट्रेनमधून तरूणी उतरली आणि तिनं सारा घटनाक्रम कथन केला.


नेमकं काय घडलं?


साधारणपणे वर्षभरापूर्वी म्हणजेच 2023 मध्ये अंशू नामक 18 वर्षाच्या तरूणीची इन्स्टाग्रामवर एका तरूणाशी ओळख झाली. संवाद सुरू झाला. हळूहळू नंबर एक्सचेंज झाले. व्हॉईल कॉलिंग सुरू झाली. या तरूणानं आपलं नाव हर्षकुमार यादव असं सांगितलं. तसेचं तो रत्नागिरी येथे राहत असून त्यांच्या बाबांच्या व्यवसाय असल्याचं देखील सांगितलं. संवाद वाढत गेला. प्रेम बहरत गेलं. गोष्टी अगदी लग्नापर्यंत गेल्या. पण, घोडं काही पुढं जात नव्हतं. 


एके दिवशी या हर्षकुमार यादवनं घरच्यांची आपल्या लग्नाला परवानगी मिळाल्याचं सांगितलं. त्यानंतर लग्नासाठी रत्नागिरीला बोलावून घेतलं. प्रेमात आकांत बुडालेल्या अंशूनं थेट रत्नागिरी गाठलं. विषेश बाब म्हणजे या प्रवास खर्चासाठी हर्षकुमारनं तिला पैसे देखील पाठवले. पण, रत्नागिरीला पोहोचल्यानंतर अवघ्या काही तासात तरूणीला आपली फसवणूक झाल्याची बाब ध्यानात आली.


नोकरी शोधत असताना मोबाईल दुकानदारानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पोलिसांना या साऱ्या प्रकरणी लक्ष घातले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना संपर्क साधला गेला. सध्या ही तरूणी सुखरूप तिच्या घरी गेली आहे. यावेळी बोलताना तिनं आपलं स्वप्न आणि झालेली फसवणूक याबद्दल खेद व्यक्त करून माफीदेखील मागितली आहे. 


समाजमाध्यमांचा वाढता दुरूपयोग


सध्या विविध समाजमाध्यमांचा दुरूपयोग वाढत आहे. फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. कधी आर्थिक तर वेगवेगळ्या भूलथापांना बळी पडलेले देखील अनेक जण आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत देखील वापरकर्त्यांनी अधिक जागृक होणे गरजेचं आहे. तरूण - तरूणींमध्ये ऑनलाईन प्रेम आणि त्यातून झालेली फसवणूक ही बाब काही नवीन नाही. पण, असं असलं तरी त्यातून धडा मात्र घेतला जात नाही. पंजाबहून रत्नागिरी गाठलेल्या अठरा वर्षाच्या अंशुच्या बाबतील देखील ही बाब लागू होते. 


नोकरी शोधत असताना मोबाईल दुकानदारानं प्रसंगावधन दाखवले नसते तर काय झाले असते? याचा विचार न केलेला बरा. त्यामुळे रत्नागिरी सारखं तुलनेनं छोटं शहर असो किंवा ग्रामीण भाग. या ठिकाणी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईलसारखी वस्तू देताना आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे ही बाब देखील पालकांसाठी महत्त्वाची असल्याचं एक्सपर्ट सांगतात. 


ही बातमी वाचा: