Ratnagiri Govinda Death : राज्यभरात दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दहीहंडी (Dahi Handi 2022) उत्सव साजरा झाला. गोविंदा पथकांकडून एकावर एक थर रचून दहीहंडी फोडण्यात आली. एकीकडे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला तर रत्नागिरीतील (Ratnagiri) दापोलीमध्ये (Dapoli) दहीहंडी सणावर विरजण पडलं. दहीहंडी पथकात नाचताना एका गोविंदाचा (Govinda) मृत्यू झाला. वसंत लाया चौगले (वय 55 वर्षे) असं या गोविंदाचं नाव आहे. दहीहंडी पथकात नाचतान वसंत चौगले चक्कर येऊन पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं.


नाचत असताना छातीत कळ, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू 
दापोलीतील पाजपंढरी गावात ही दुर्दैवी घटना घडली. या गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काल (19 ऑगस्ट) सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. वसंत लाया चौगले हे देखील दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. परंतु नाचत असतानाच अचानक त्यांच्या छातीत कळ आली आणि ते खाली, अधिक कोसळले. उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. नाचताना गोविंदाचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पंचक्रोशीतील गोविंदांवर दुःखाचं सावट पसरलं. तर वसंत लाया चौगले यांच्या आकस्मिक निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. 


मुंबईतील वरळीमध्ये गोविंदा थेट सहाव्या थरावरुन कोसळला
दहीहंडीचा उत्साह काल सर्वत्र पाहायला मिळाला. परंतु या उत्साहादरम्यान काही अनपेक्षित घटना समोर आल्या. मुंबईच्या वरळी इथल्या जांबोरी मैदानावर आयोजित भाजपच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात एक दुर्घटना घडली आहे. एक गोविंदा थेट सहाव्या थरावरुन कोसळला आहे. या दुर्घटनेत गोविंदा जागीच बेशुद्ध झाला. त्याला बेशुद्ध अवस्थेतच केईएम रुग्णालयात नेण्यात आलं.


मुंबई-ठाण्यात 148 गोविंदा जखमी
एकीकडे राज्यभरात मोठ्या उत्साहात सण साजरा झाला, तर दुसरीकडे दहीहंडी पथकांतील अनेक गोविंदा जखमीही झाले. काल (शुक्रवारी) दिवसभरात मुंबई आणि ठाणे मिळून एकूण 148 गोविंदा जखमी झाले. मुंबईसह आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह दिसून आला. मात्र काही ठिकाणी गोविंदांचे अपघातही झाले. मुंबईत 111 गोविंदा जखमी झाले, तर यातील 88 जणांना उपाचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर दुसरीकडे ठाण्यात 37 गोविंदा जखमी झाले आहेत. तसंच 23 गोविंदांवर अजूनही उपचार सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही गोविंदाला मोठी दुखापत झालेली नाही. तर, सुदैवाने कोणीही मृत्युमुखी पडलेलं नाही.