Ratnagiri Barsu Refinery Protest : रत्नागिरीतील बारसू रिफायनरीवरुन राज्याचं वातावरण जास्तच तापलं आहे. सर्वेक्षणाविरोधात गावकऱ्यांची आंदोलनंदेखील सुरु आहेत. याच आंदोलनात घडत असलेल्या प्रकाराचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निषेध केला आहे. पोलिसांकडून मुस्कटदाबी होऊ नये जे आहे ते संमतीने झाले पाहिजे, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. 


रत्नागिरीतील बारसू रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमीपूत्रांची, आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरु आहे. आंदोलकांना अटक करण्यात येत आहे. पत्रकारांना धमकावण्यात येत आहे. या मुस्कटदाबी, धमकीसत्राचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. 


अजित पवार म्हणाले की, व्यवस्थेत शांततामय मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून राज्य सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करावा, पोलिसांची दडपशाही थांबवावी, हे आंदोलन मानवी दृष्टीकोनातून संवेदशीलपणे हाताळावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच विकासाची भूमिका घेतली आहे, परंतु विकास सर्वांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. स्थानिक भूमीपूत्रांच्या हितांचं, हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. स्थानिक भूमीपुत्रांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं. स्थानिक ग्रामस्थ, तरुण, महिलावर्गावर पोलिसांकडून दडपशाही करण्यापेक्षा समन्वय, संवादातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.


अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यकर्त्यांनी हस्तक्षेप करावा. तेथील नेत्यांनी त्या गोष्टीवर सामंजसपणाने तोडगा काढावा.. राष्ट्रवादीची भूमिका ही विकासाच्या बाजूने आहे कोणताही विकास काम करत असताना, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही? पुढच्या भावी पिढीचे नुकसान होणार नाही. त्या परिसराचे जे काही वातावरण आहे, त्या पर्यटनामुळे तिथल्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतो. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की तिथल्या लोकांची बाजू ऐकून घेतली पाहिजे आणि त्यात तथ्य असेल तर मार्ग काढावा.तथ्य नसेल तर समजून सांगण्याची भूमिका ठेवावी, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केली आहे. 


या प्रकल्पाबाबत अनेकांची वेगवेगळी मतं असतील. प्रकल्प नाही व्हावा, असं म्हणणारा वर्ग मिळणार नाही.परंतु जे विरोध करीत आहेत त्यांची कारण काय ? पर्यावरणाच्या विरोधात असेल तर कोकणचे जे वातावरण आहे, ते बिघडवण्याच्या निमित्ताने असेल तर समजून सांगितले पाहिजे.त्यांच्या शंकेच निरसन केलं पाहिजे.या संदर्भात "मुस्कटदाबी होऊ नये जे व्हावे ते संमतीने झाले पाहिजे. यातून सामंजस पद्धतीने मार्ग काढला जावा, अशी विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे.