रत्नागिरी : आदित्य ठाकरे यांनी युतीमधून निवडून येऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संसार उभा केला, त्यांनी पहिला राजीनामा द्यावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली. भास्कर जाधव हे अत्यंत खोटारडे असल्याचा आरोपही त्यांनी केला. रामदास करम यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, भास्कर जाधव आणि अनंत गिते या शिवसेनेच्या नेत्यांवर चांगलीच टीका केली.
नौटंकी करण्याचे काम फक्त भास्कर जाधवच करु शकतात. 1995 ला मी शिवसेना प्रमुखांना विनंती करुन त्यांना तिकीट द्यायला लावलं होतं. तेव्हा रस्त्यावर आडवे पडून माझ्या पायावर डोके ठेवले होते, हे सर्व ते विसरले. त्यावेळी उद्धवजीनी 9 तास बसवून ठेवले होते आणि भेटलेच नाहीत. शिवसेना सोडली तेव्हा चिपळूणच्या बहादूरशेख नाक्यावर ढसाढसा रडत होते. हा माणूस खोटा आहे.
उदय सामंत यांनी सर्व भांडफोड केल्याने मी उदय सामंत यांच्या सोबत गेलो. भास्कर जाधव गुवाहाटीला जाण्यासाठी कुठपर्यंत गेले होते ते मी उद्याच्या सभेत बोलणार आहे. एकनाथ शिंदेनाही माहिती आहे, भास्कर जाधव गुवाहाटीमध्ये जाण्यासाठी कुठपर्यंत गेले होते. गीतेंच्या विरोधात मी जे बंड केले ते उद्धवजीना सांगून केले. तुम्ही सापासारखं कस बदलता, रायगडला सर्वात आधी राष्ट्रवादीच्या विरोधात त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.
आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा
रामदास कदम पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा. आदित्य ठाकरे हे शिवसेना भाजप युतीमध्ये निवडून आले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या युतीमधून निवडून येत त्यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत संसार केला आहे. त्यांनी गद्दारी केली आहे. आम्ही त्यांचं राजीनाम्याचं आव्हान स्वीकारतो.
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले की, "रामदास कदमांची शिवसेनेतून हाकलपट्टी केली आणि त्यावेळेला रामदास कदम हे सातत्याने मीडियाच्यासमोर जाऊन डोळ्यामध्ये ग्रीसरीन टाकून ढसाढसा रडण्याचे नाटक करत होते. रामदास कदम यांच्यासारखा खोटा माणूस उभ्या हिंदुस्थानात सापडणार नाही. केशवराव भोसलेचे ड्राव्हर म्हणून शिवसेनेच्या विरोधात प्रचार करीत होतात. मी राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री असतांना तुम्ही माझे पाय धरलेत. मी राष्ट्रवादीत येतोय मला तुम्ही विरोध करु नका, राष्ट्रवादीला शिव्या देवून उद्धव साहेबांना बदनाम करु नका. रामदास कदम तुम्ही सांगताय माझ्या पोराला संपवायच काम अनिल परबांनी केलं, उदय सामंतांनी केलं. आज त्याच उदय सामंतांच्या पायावर लोटांगण घातलं आहे."