रत्नागिरी:  वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता टाटा एअरबसचा प्रकल्प देखील गुजरातला गेला आहे. त्यावरून सध्या जोरदार आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत. पण, त्याचवेळी आता कोकणातील रिफायनरीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण ऊर्फ भैय्या सामंत कोकणात रिफायनरी व्हावी यासाठी पुढाकार घेणार आहेत. त्यामुळे थेट मैदानात उतरून आता रिफायनरीसाठी मोठ्या प्रमाणात समर्थन मिळवणे, स्थानिकांमध्ये प्रकल्पाबाबत असलेली नाराजी, विरोधांची कारणं समजूत घेत ती दूर करणं यासाठी आता थेट किरण सामंत पुढाकार घेणार आहेत.


 उदय सामंत हे उद्योगमंत्री झाल्यापासून त्यांनी कायम रिफायनरीच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली आहे. शिवाय, पुढील सहा महिन्यात मोठा प्रकल्प राज्यात येईल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी टाटा एअरबसच्या प्रकल्पाबाबत बोलताना दिली आहे. परिणामी आता किरण सामंत मैदानात उतरत असल्यानं प्रकल्प वेगानं पुढं जावा यासाठी लगेचच चक्र फिरवली जात आहेत का? त्यासाठीच आता सामंत यांचे बंधू रिफायनरीच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. नाणार इथं रद्द झालेला रिफायनरी प्रकल्प आता बारसू - सोलगावमध्ये व्हावा यासाठी सध्या चाचपणी केली जात आहे. यासाठी ड्रोन सर्व्हे आणि माती परिक्षण देखील केले जात होते. पण, स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम अद्याप देखील अर्धवट आहे. त्याचवेळी उद्योगमंत्र्यांच्या भावानं रिफायनरीसाठी मैदानात उतरण्याची तयारी दर्शवल्यानं या प्रकल्पाच्या संबंधित घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. 


सामंत यांचा भाऊ मैदानात उतरल्यास काय होईल? 


कोकणातील रिफायनरीसाठी नारायण राणे देखील सध्या आ्ग्रही आहेत. शिवाय, ठाकरे गटाचे स्थानिक आमदार राजन साळवी देखील प्रकल्पाचे समर्थन करत आहेत. सध्या रिफायनरीला होत असलेलं समर्थन हे बेरोजगारीच्या मुद्यावर आहे. पण, त्याचवेळी किरण सामंत यांच्या मैदानात उतरण्याला देखील महत्त्व आहे. कारण, उदय सामंत यांच्या माघारी त्यांच्या मतदारसंघातील अनेक कामं किरण सामंत सांभाळतात. उदय सामंत यांच्या राजकीय घडामोडीमध्ये देखील किरण सामंत यांचा मोठा वाटा असल्याचं जाणकार सांगतात. त्यामुळे किरण सामंत यांची ओळख किंगमेकर म्हणून देखील आहे. उच्च शिक्षित आणि योग्य वेळी योग्य चाल खेळण्यास त्यांचा हातखंडा असल्याचे दाखले देखील अनेक जण देतात. त्याचमुळे एकीकडे होत असलेला विरोध पाहता आता किरण सामंत यांच्या रिफायनरी समर्थनार्थ भूमिकेमुळे रिफायनरी समर्थन वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय, राजकीय मतभेद सोडता राणे - सामंत रिफायनरीच्या मुद्यावर एकत्र आल्यास त्याचा मोठा फायदा रिफायनरी समर्थनार्थ होणार असल्याचं देखील मानलं जातं. त्यामुळे किरण सामंत यांच्या रिफायनरी समर्थनार्थ भूमिकेमुळे, रिफायनरीच्या समर्थनार्थ मैदानात उतरण्याच्या निर्णयामुळे प्रकल्पाच्या बाजुनं असणाऱ्यांना देखील बळ मिळणार आहे. 


'किंगमेकर' राजकारणात सक्रिय!


किरण ऊर्फ भैय्या सामंत यांना किंगमेकर म्हणून देखील वेगळी ओळख आहे. पण, त्यांची दिपक केसरकर यांनी सिंधुरत्न योजनेच्या सदस्यपदी निवड केली आहे. त्याचवरून आता किरण सामंत राजकारणात सक्रिय झाले का? अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.