Bhaskar Jadhav: शिवसेनेचे नेते आणि ठाकरे गटातील गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावरील कथित हल्ला प्रकरणात आता महाविकास आघाडीतील नेत्यानंच घरचा आहेर दिलाय, असं म्हणावं लागेल. कारण भास्कर जाधव यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष आणि माजी आमदार रमेश कदम यांनी थेट सीबीआय चौकशी व्हावी असं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. कोण म्हणतं सुरक्षा व्यवस्था काढली म्हणून हल्ला झाला. काही जणांनी एकच पेट्रोलची बाटली, दगड आणि काठी सापडली म्हणून चर्चा देखील केल्या. पण एका लोकप्रतिनिधीच्या घरावर झालेला हल्ला हा लांचनास्पद आहे. त्यामुळे विविध चर्चा जरी सुरू असल्या तरी पोलिसांकडून काही स्पष्टता येत नसल्यास सीबीआय चौकशी करावी, असं विधान यावेळी रमेश कदम यांनी केले आहे. 


दरम्यान कदम यांनी केलेल्या विधानामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावत चर्चांना सुरुवात झाली आहे. सीबीआय चौकशीबाबत विधान करत असताना कदम यांना नेमकं काय सुचवायचं? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. जाधव यांच्या घरावर झालेल्या कथित हल्ला प्रकरणाचा पोलीस सध्या तपास करत आहेत. याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. कोणत्याही प्रकारची माहिती लिक होणार नाही, याची देखील काळजी घेतली जात आहे. त्याचवेळी या संपूर्ण प्रकरणात ट्विस्टन अँड टर्न येणार असल्याची कुजबुज देखील ऐकू येत आहे. त्यामुळे कदम यांना नेमकं काय सुचवायचं? असा देखील एक सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. 


जाधव यांच्या घरावर कथित हल्ला प्रकरणात पोलीस आठवड्याभरात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या तपासातून नेमकं काय निष्पन्न होणार? पोलिसांचा तपास नेमका काय सांगणार? याची उत्सुकता देखील सध्या  दिसून येत आहे. सध्या भास्कर जाधव विरोधी पक्षावर तुटून पडत आहेत. त्यात निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यात देखील जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. अशा पार्श्वभूमी वरती  जाधव यांचा घरावरील कथित हल्ला झाल्याने कोकणातल्या राजकीय वर्तुळात देखील विविध चर्चा रंगलेल्या दिसून येत आहेत.  त्यात आता महाविकास आघाडीतीलच एका जबाबदार पदावर नेत्यांने सीबीएस चौकशीबाबत विधान केल्याने आता अधिक जोरात चर्चा सुरू होणार हे नक्की.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sharad Pawar : 'मी काय म्हातारा झालोय का?' म्हणत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी