Khed Jagbudi River : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुर आहे. खेडमध्ये (Khed) मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर (Jagbudi River Flood) आला आहे. जगबुडी नदी सध्या  इशारा पातळीच्या वर वाहत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत.


नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी


सतत पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे सध्या जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर खेड शहराच्या अगदी बाजूने वाहणारी ही नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी नदीकाठी विनाकारण फिरु नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शहरात सखल भागात पाणी साचले असून शिवतर मार्गावर अरुंद गटारांमुळे पाणी रस्त्यावरती येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.  दरम्यान, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आहे. कोकणातील अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.


पावसाचा जोर वाढल्यास नद्या पात्र सोडून वाहण्याची शक्यता 


रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड दापोली भागात कालपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळं या भागातील नद्या पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर वाढू लागल्यास या भागातील नद्या पात्र सोडून वाहण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. मात्र, सद्यस्थितीत पावसाने उसंत घेतल्यामुळं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 


जून महिन्यात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद


यावर्षी जून महिन्यात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जून महिन्यात एवढा पाऊस होत नाही. पण यावर्षी जून महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं शेतकरी देखील समाधानी आहेत. दरम्यान, यावर्षी एल निनोटी परिस्थिती नसल्यामुळं चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं देखील वर्तवला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी यंदाचा पावसाळा चांगला असल्याचं बोलले जात आहे.


महत्वाच्या बातम्या:


अखेर मान्सून नागपूरसह पूर्व विदर्भात दाखल, यंदा 5 दिवस विलंब, हवामान खात्याची माहिती