Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिंदे गटात गेलेले रामदास कदम (Ramdas Kadam) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) यांना धक्का देण्यासाठी ठाकरे गटाने आता रणनीती आखली आहे. माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांची घरवापसी होणार आहे. पुढील पंधरा दिवसात हा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. उद्धव ठाकरे यावेळी हजर राहणार असून खेडच्या गोळीबार मैदानामध्ये जाहीर सभा देखील होण्याची शक्यता आहे. सध्या संजय कदम शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील करत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार? याबाबतच्या चर्चा आतापासूनच सुरु झाल्या आहेत. त्याला कारण म्हणजे मूळचे शिवसैनिक असलेले माजी आमदार संजय कदम यांची घरवापसी. दापोली-खेड-मंडणगड या विधानसभा मतदारसंघात रामदास कदम आणि योगेश कदम यांना धक्का देण्याची रणनीती आता ठाकरे गटाकडून आखली जात आहे. त्यासाठी माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेनेतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये संजय कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याबाबतची सर्व तयारी आणि बोलणी देखील पूर्ण झाली आहेत. संजय कदम यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी, सहकारी यांच्याशी शिवसेनेतील प्रवेशबाबत चर्चा केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा पक्षप्रवेश?
सध्या संजय कदम बैठका देखील घेत आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे त्यांच्या या प्रवेशाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील हजर राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश होऊ शकतो. त्यामुळे पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होणे हीच केवळ औपचारिकता असल्याची माहिती सूत्रांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.
संजय कदम यांच्या येण्याने कशी बदलतील गणितं?
राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय बंडानंतर योगेश कदम शिंदे गटात गेले. त्यानंतर कदम यांना आव्हान उभा करणारा तगडा चेहरा कोण? याची चाचपणी सुरु झाली. संजय कदम हे 2014 साली शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी सूर्यकांत दळवी यांचा पराभव केला होता. पण 2019 मध्ये त्यांना जवळपास दहा हजारांच्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या ठिकाणी योगेश कदम हे आमदार झाले. त्यामुळे माजी आमदार म्हणून संजय कदम यांची काही मतं आहेत.
रामदास कदम यांना संजय कदम यांचं आव्हान
शिवाय शिवसेनेचे पाठबळ मिळाल्यास मूळचे शिवसैनिक असलेल्या संजय कदम यांची गणित आणखी सोपी होऊ शकतात असा एक राजकीय अंदाज आहे. हीच बाब लक्षात घेत आता संजय कदम हे शिवसेनेत प्रवेश करु शकतात. महाविकास आघाडी झाल्यास दापोली-मंडणगड-खेड ही विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाटेला जाणार आहे. कारण त्या ठिकाणाहून शिवसेनेचे आमदार योगेश कदम निवडून आले होते. हीच बाब लक्षात घेत शिवाय रामदास कदम यांना तगडं आव्हान उभे करण्यासाठी संजय कदम यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे.