Anil Parab's Sai Resort : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील मुरुड इथल्या साई रिसॉर्ट (Sai Resort) तोडकामासाठी बांधकाम विभागाने निविदा मागवल्या आहेत. चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वृत्तपत्रात रविवारी (11 सप्टेंबर) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 12 सप्टेंबर 2022 ते 22 सप्टेंबर 2022 या कालावधीपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.


साई रिसॉर्ट एनएक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे. 


जाहिरातीत काय म्हटलं?
सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण, मौजे मुरुड,  दापोली येथील स. नं. 446 मधील साई रिसॉर्ट एनएक्स व सी कौंच रिसॉर्ट बांधकामासाठी व इमारतीकरिता पुरवलेल्या सोईसुविधा निष्कासन करणे व त्याअनुषंगाने निर्माण होणारी संभाव्य मोडतोड आणि इतर सामुग्री योग्यरितीने गोळा करुन विल्हेवाट लावणेसाठीचे व वापरात येणाऱ्या साहित्याचे मूल्यांकन करणे, तसेच स.नं. 446 मध्ये अस्तित्त्वात असलेल्या इमारती व इतर बाबींचे सविस्तर नकाशे (Drawing) 5 प्रतीत तयार करुन त्याला सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेणे याकरिता योग्या त्या सल्लागाराची नियुक्ती करणेकरिता दरपत्रक मागविणेत येत आहे.


दिनांक 12.09.2022 ते 19.09.2022 या कालावधीमध्ये तत्सम सल्लागारांकडून मोहरबंद लखोट्यातून दरपत्रके मागविणेत येत आहेत. मागविणेत आलेली दरपत्रके या कार्यालयात दि. 22.09.2022 रोजी दुपारी 14.00 वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस धरुन) कार्यालयात स्वीकारणेत येतील. स्वीकारणेत आलेलली दरपत्रके शक्य झाल्या त्याच दिवशी उघडणेत येतील. 


अटी व शर्ती खालीलप्रमाणे
1. इमारत निष्कासन करणे व निर्माण होणारी संभाव्य मोडतोड व इतर सामग्रीचे योग्यरितीने गोळा करुन विल्हेवाट लावणे. याबाबतचे मूल्यांकनाचा अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत सादर करणे अनिवार्य राहिल.
2. पॅनकार्ड तसेच वस्तू व सेवाकर दरपत्रकासोबत जोडणे आवश्यक आहे.
3. कार्यकारी अभियंता यांचे कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवर निविदा दरपत्रक पहावयास मिळेल.
4. कोणतेही कारण न देता आलेली सर्व दरपत्रके मंजूर करणे व नाकारण्याचा अधिकार स्वाक्षरीकार यांनी राखून ठेवलेला आहे.




किरीट सोमय्यांचे आरोप काय?
अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले होते. 


अनिल परब यांची ईडी चौकशी
शिवसेना नेते अनिल परब यांची दापोली रिसॉर्ट प्रकरणी याआधी ईडीने चौकशी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री असताना अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आणि खासगी निवासस्थानी ईडीकडून मे महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर अनिल परब यांची तीन वेळा ईडी चौकशी करण्यात आली होती. साई रिसॉर्ट आपले नसल्याचा दावा परब यांनी याआधीच केला आहे. 


VIDEO : Dapoli Sai Resort पाडण्यासाठी वर्तमानपत्रात निविदा, Kirit Somaiya यांचं ट्वीट