Chiplun Gudhipadwa Tradition: चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे तापमान वाढायला लागतं आणि एक प्रकारे पाण्याची पातळी कमी होण्याची संकेत मिळू लागतात हे निसर्गाचा साध गणित. गुढीपाडवा हा याच निसर्गचक्राचा भाग. राज्यभरात दाराबाहेर गुढी उभारत नव्या वर्षाचं आणि बदलत्या निसर्गचक्राला सामोरे जाण्यासाठी नागरिक तयार होतात. नव्या ऋतूचं स्वागत करतात. राज्यभरात गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा रथयात्रा विविध प्रदर्शने घडवली जात असताना समुद्रकिनाऱ्या लाभलेल्या चिपळूणच्या गोवळकोंड गावात एक अनोखी प्रथा आहे. वशिष्ठी नदीच्या मासेमारीवर अवलंबून असलेला भोई समाज आजच्या दिवशी वशिष्ठी नदीच्या पाण्यात उतरतो आणि नदीला उतराई म्हणून चक्क दारू वाहतो!
भारतीय संस्कृतीतलं निसर्गाचे आभार मानण्याची परंपरा मोठी गमतीची आहे. आपलं आणि निसर्गाचं नातं कुठल्यानं कुठल्या रुपात जपलं जातं ते असं. वर्षभर वशिष्ठी नदीच्या पाण्यातल्या मासळीवर उदरनिर्वाह केला. आता उष्णतेनं नद्यांमध्ये बाष्पीभवन वाढतं. नदीतलं पाणी कमी होऊ लागतं. त्यामुळे जसं वर्षभर मासळी मिळत राहिली तशीच वर्षभर मिळत राहो म्हणून हा अभिषेक.
वशिष्ठीच्या पाण्यावर भोई समाजाचं उदरभरण
वशिष्ठी नदीच्या किनारी वसलेल्या भोई समाजाचा उदरनिर्वाह नदीतल्या मासेमारीतूनच होतो. या संपूर्ण समाजाची रोजी रोटी या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. वशिष्ठी नदीपात्रात असणारी मासळी विकून या संपूर्ण समाजाचे पोट भरतं. ज्या निसर्गामुळे आपलं पोट भरतं त्याची जाण असावी यासाठी अनादी काळापासून चिपळूणच्या या गावात सुरू असलेली ही परंपरा आजही गोवळकोटमध्ये तरुण पिढीकडून पाळली जाते. गावातले तरुण नदीपात्रात उतरतात आणि नदीला मध्य अर्पण करतात. नारळी पौर्णिमेला समुद्र आणि नदीला नारळ अर्पण केला जातो.
बेटावर जमतात, एकत्र वेळ घालवतात अन्...
चिपळूण मधल्या गोवळकोट गावातले भोईवाडीतील भोई समाजाचे लोक एका बेटावर जातात. ही जागा पहिल्यापासून ठरलेली आहे. एकत्र जमून देवाला आडस घातला जातो. देवाला हाक मारली जाते. तिथे दारूची धार सोडली जाते. गावातील सगळेजण लहान मुलांपासून ते वरिष्ठापर्यंत एका जागी जमतात प्रथेच्या निमित्ताने दिवसभर एकत्र वेळ घालवतात आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या गावी परततात. वशिष्ठी नदीतल्या पाण्यातली मासळी अशीच वर्षभर मिळत राहो अशी प्रार्थना भोई समाज गुढीपाडव्याच्या निमित्ताने करतो. नदीतला माशांचे प्रजनन चांगलं होऊ दे. आणि संपूर्ण समाजाचा उदरनिर्वाह चांगला राहू दे यासाठी ही पद्धत अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं नागरिक सांगतात.