Maharashtra Ratnagiri Politics: रत्नागिरी : शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड, रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) असा त्यांचा दौरा सध्या सुरू आहे. या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. जाहीर सभा देखील घेत आहेत. त्यांच्या जाहीर सभांची संख्या देखील लक्षणीय अशी आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर तिन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास जवळपास 50 टक्के म्हणजेच सहा आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पक्ष बांधणे ही महत्त्वाची आहे.


लोकसभेची निवडणूक तोंडावरती आहे. अशा पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना नवी उमेद देणं यासाठी या दौऱ्याकडे पाहिलं जातं. तसा विचार केल्यास खूप मोठ्या प्रमाणात पडझड ही कोकणातल्या भागात झालेले दिसून येत नाही. पण कार्यकर्त्यांकडे ठोस असा प्रोग्राम नसणं, आगामी राजकारणाबाबत दिशा निश्चित नसणं याबाबत संभ्रम स्थानिक पातळीवर नक्कीच दिसून येतो. त्यामुळे ठाकरे यांच्या या दौऱ्यातून काहीतरी हाती लागेल अशी आशा कार्यकर्त्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी देखील कोकणचा दौरा केलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना सध्या चांगलीच सक्रिय झालेली आहे. शिवाय भाजपने देखील ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कोकणात लक्ष टाकण्यास सुरुवात केलेली आहे. त्या अनुषंगाने ठाकरेंच्या कोकण दौऱ्यातून काय साध्य होणार? यावर देखील चर्चा होताना दिसून येते.


पहिल्याच दिवशी ठाकरेंना भाजपचा धक्का; आता ठाकरे तयारित


उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा पेणपासून सुरू झाला. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. खेड - दापोली- मंडणगड या विधानसभा मतदारसंघांमधील माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दळवी यांनी पंचवीस वर्ष आमदारकी भूषवली होती. शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर देखील ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. पण त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना बसलेल्या राजकीय धक्क्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर ठाकरे गट देखील सक्रिय झाला असून खेड - दापोली - मंडणगड या विधानसभामतदारसंघातील भाजपमधील काही स्थानिक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या दापोली येथील दौरा वेळी ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूर्यकांत दळवी यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू असताना भाजपतील एक गट नाराज होता. दळवी यांच्या भाजप प्रवेशाला त्यांच्याकडून विरोध देखील दर्शवला गेला होता. अर्थात या पदाधिकाऱ्यांनी 'एबीपी माझा'कडे या संदर्भातली नाराजी व्यक्त देखील केली होती. त्यामुळे नाराज असलेले काही पदाधिकारी आता थेट ठाकरेंना साथ देणार असल्याची माहिती मिळत आहे. परिणामी उद्धव ठाकरेंचा एक भाजपला धक्का असेल अशा प्रकारचे चर्चा सध्या दापोलीमध्ये सुरू झालेली आहे.


ठाकरेंच्या दौऱ्याची काही प्रमुख वैशिष्ट्य


दरम्यान उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा ठाकरेंकडं धनुष्यबाण हे चिन्ह नसणं, सत्ताधारी लोकप्रतिनिधींची तुलना करता विकासकामांमध्ये मागे असणं, भाजपच्या साथीनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं केलेली राजकीय कोंडी यासारख्या आव्हानांना सामोरं जाणं, कार्यकर्त्यांना नवी उमेद, विश्वास देणे, यंत्राच्या चौकशीचा ससेमिरा लोकप्रतिनिधींच्या मागे लागलेला असताना त्यांच्या पाठिशी उभे राहणे यासारख्या अनेक कारणांनी महत्त्वाचा ठरतो. तर,रायगड असो अथवा रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निश्चित नसताना, उमेदवारीवरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र लोकसभा प्रचाराला सुरूवात केली.शिवाय, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांनी अद्यापपर्यंत तरी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला...त्यामुळे मोठी पडझड झालेली दिसून येत नाही. या दोन सध्या जमेच्या बाजु. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्ते, शिवसैनिक यांना उर्जा मिळेल हि बाब नाकारता येणार नाही. पण, या दौऱ्याची उपयुक्तता आगामी काळात अर्थात लोकसभा निवडणुकीनंतर कळेल हे नक्की!