Ratnagiri News : कोकणातल्या रिफायनरी (Barsu Ratnagiri Refinery)विरोधातील आंदोलनातील आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण, रिफायनरी विरोधकांनी केलेल्या मागणीनंतर आज (27 एप्रिल) प्रशासन, रिफायनरी विरोधक, रिफायनरीचे समर्थक, तज्ज्ञ मंडळी यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे. दुपारी चार वाजता राजापुरातील तहसील कार्यालयामध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या विरोधकांचा आक्रमकपणा पाहता आजच्या बैठकीतून नेमका काय तोडगा निघणार? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? आणि या बैठकीचे फलित नेमकं काय असणार? aसर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. सध्या रिफायनरीचं माती परीक्षण सुरु आहे. त्याविरोधात आंदोलक महिलांनी थेट पोलिसांच्या गाडीसमोर झोपून थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा विरोध मोडून काढत माती सर्वेक्षणाला सुरुवात देखील केली. पण सध्या या विरोधात माळरानावर विरोधीकांनी रात्रंदिवस या मांडला आहे. राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील याची दाखल घेतली. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून वेळ पडल्यास मुंबईतील शिवसेना समर्थनार्थ कोकणात उतरु असं आश्वासन देण्यात आले. त्यामुळे या साऱ्या घडामोडी पाहता एकंदरीत सध्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या दृष्टीने आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे.
तत्पूर्वी माती परीक्षण केली जाणार ही माहिती समोर आल्यानंतर बारसूमध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलं ते जाणून घेऊया
1) सोमवारपासून (24 एप्रिल) कोकणातल्या रिफायनरीचं माती परीक्षण केलं जाणार असल्याची माहिती पुढे आली. स्थानिकांनी थेट आपला मुक्काम रविवारी (23 एप्रिल) माळारानावरती हलवला.
2) सोमवारपासून (24 एप्रिल) प्रत्यक्षात माती परीक्षणाला सुरुवात झाली नाही. पण त्यानंतर देखील स्थानिक आपल्या आंदोलनावरती ठाम होते. पोलिसांनी रत्नागिरी शहरासह राजापूर भागात रुट मार्च काढला. यावेळी नागरिकांना माती परीक्षण सुरु असलेल्या भागात कलम 144 लागू असून शांतता आणि सहकार्याचे आवाहन करण्यात आलं.
3) रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद बोलावून माती परीक्षणाची माहिती दिली. त्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेला पोलिसांचा फौजफाटा याची आकडेवारी सादर करत संबंधित भागातील लोकांना सहकार्याचं आवाहन केलं.
4 ) मंगळवारपासून (25 एप्रिल) प्रत्यक्षात माती परीक्षण सुरू करण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता पोलीस माळरानावर रवाना होत होते. त्यावेळी महिलांनी थेट रस्त्यावरती झोपून पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला.
5) यानंतर पोलिसांनी 110 प्रकल्पग्रस्त आंदोलक महिला आणि पुरुषांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्याच संध्याकाळी त्यांना राजापूर कोर्टात सादर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. या साऱ्या घडामोडी घडल्यानंतर देखील रिफायनरीच्या माती परीक्षणाचं काम काही थांबलं नाही. स्थानिकांनी केलेला विरोध पाहता प्रशासनाने विरोधकांशी संवाद साधला. त्यानंतर शंकांचं निरसन करण्यासाठी गुरुवारी आंदोलक, प्रशासन, तज्ज्ञ मंडळी, रिफायनरी समर्थक अशी बैठक करावी यावर एक मत झाले.
6) बुधवारी (26 एप्रिल) ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांची भेट घेण्यासाठी निघाले. यावेळी त्यांची गाडी रानताळे येथे पोलिसांनी अडवली. त्यानंतर मोजक्याच लोकांसह राऊत यांना रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी पाठवण्यात आले. यावेळी बोलताना राऊत यांनी शिवसेना तुमच्या साथीला असेल असा आश्वासन रिफायनरी विरोधकांना दिले. एकीकडे या साऱ्या घडामोडी सुरु असताना स्थानिक आमदार राजन साळवी यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर रिफायनरीला समर्थन असं ट्वीट केलं. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय? असा सवाल विचारला जाऊ लागला.
7) बुधवारी (26 एप्रिल) दुपारी 2.30 वाजता सध्याचे कोकणात सुरु असलेले आंदोलन पाहता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी गुरुवारी होणाऱ्या चर्चेवेळी रिफायनरी विरोधकाच्या नेत्यांना हजर राहण्यास परवानगी मिळावी. त्यांना अटक केले जाऊ नये अशी मागणी केली.