Ratan Tata Shantanu Naidu: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांच्यावर काल (10 ऑक्टोबर) वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी  विविध क्षेत्रांतील मान्यवरांबरोबरच प्रचंड जनसागर उपस्थित होता. एका युगाचा अस्त झाल्याची भावना यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. 


रतन टाटा (Ratan Tata) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचा युवा मित्र शांतनू नायडू (Shantanu Naidu) याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले. रतन टाटा अनंतात विलीन झाल्यानंतर शांतनू स्मशानभूमीबाहेर आला. यावेळी बाहेर असलेल्या लोकांची त्याच्यावर नजर पडताच शांतनू सर, शांतनू सर...अशा हाका ऐकायला येऊ लागल्या. लोकांच्या भावना पाहता अतिशय शांतपणे जमावाला हात जोडून 'everything is over...', असं म्हणाला. शांतनूचे हे तीन शब्द ऐकताच जमाव पूर्णपणे शांत झाला. तसेच जमावातील लगेच काही लोकांना रडू कोसळले. 






रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला कोण-कोण?


रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, अभिनेते राजपाल यादव तसेच रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा, जिम्मी नवल टाटा, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, टाटा समूहाचे संचालक मेनोश कपाडिया, वकील रायन करंजवाल, वकील झिया मोदी आदी मान्यवर उपस्थित होते.


शांतनूच्या कामाने रतन टाटा प्रभावित-


शांतनू याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्याचा जन्म 1993 मध्ये पुणे येथे झाला. खुद्द रतन टाटा यांनी फोन करुन, तू माझ्याबरोबर काम करणार का? अशी विचारणा शांतनूला केली होती. अनेकदा नवीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ले रतन टाटा शांतनूकडून घेतात, असेही सांगितले जाते. भटक्या श्वानांसाठी केलेल्या कामामुळे रतन टाटा यांची शांतनूसोबत जवळीक वाढली. शांतनूच्या कामाने टाटा खूप प्रभावित झाले होते. 2018 पासून रतन टाटा यांच्यासोबत शांतनू काम करत आहे. शांतनू नायडू याची गुडफेलोज ही कंपनी आहे. या कंपनीचा संस्थापक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी ही कंपनी कार्यरत असते. गुडफेलोज या कंपनीचे मूल्य पाच कोटीपेक्षा जास्त आहे. यामध्ये रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली.


संबंधित बातमी:


Ratan Tata Death: तेरे जैसा यार कहा...! शांतनू पुढे, रतन टाटांचं पार्थिव मागे; Video पाहून सर्वांचे डोळे पाणावले