मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातल्या महत्त्वाच्या इमारतींवर रोषणाई करण्यात आली आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनावर नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईनं संपूर्ण परिसर झगमगून गेला आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी दिल्लीकर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव दूरूनच ही रोषणाई पाहता येते आहे.
फोटो सौजन्य: एएनआय (ANI)
दुसरीकडे, मुंबईचं सीएसटी स्टेशन, मुंबई महापालिका, मंत्रालय आणि बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सजेंची इमारतही तिरंग्याच्या रोषणाईनं उजळून निघाली आहे. वेगवेगळं औचित्या साधून सीएसटी स्थानकावर रोषणाई केली जाते. आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी अनेकांनी इथं गर्दी केली होती.
फोटो सौजन्य: एएनआय (ANI)
दुबईच्या बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट
बुर्ज खलिफा
फक्त भारतातच नव्हे तर दुबईतही तिरंग्याची सजावट पाहायला मिळत आहे. भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दुबईच्या बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे. उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अबु धाबीचे युवराज शेख महम्मद बिन जाएद अल नहयान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त दुबईमधील बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे.
दुबईमधील 2722 फुटी बुर्ज खलिफाला तिरंग्याने सजवण्यात आलं आहे. तिरंग्याने नटलेल्या बुर्ज खलिफाला पाहण्यासाठी पर्यटक आणि नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान, मंगळवारी युवराज शेख भारतात पोहचले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेख यांचे थेट विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात डझनहुन अधिक परस्पर सहकार्य करारावर उभयंतांमध्ये स्वाक्षऱ्या होणार असून, यामध्ये 75 अरब डॉलरच्या गुंतवणूकीचाही समावेश आहे. याशिवाय युवराज शेख उद्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत स्नेह भोजनही करणार आहेत.