कोल्हापूर : सरकारला पाठिंबा दिल्याचा पश्चाताप होत आहे. त्यामुळे लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करू, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे.


कोल्हापुरात एबीपी माझाशी बोलताना राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या विरोधात जाल, तर परिणाम वाईट होतील, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना एनडीएमधील घटक पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात झालेल्या महायुतीमध्ये भाजपसोबत शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांचा समावेश आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बैठक झाली होती. या बैठकीत महायुतीतील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. राजू शेट्टीही या बैठकीला उपस्थित होते.

2019 ची लोकसभा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वात लढवली जाईल, असा ठराव या बैठकीत करण्यात आला होता. सर्वानुमते हा ठराव पास करण्यात आला होता. मात्र आता राजू शेट्टींनी एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्र बंदला पाठिंबा : राजू शेट्टी

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचंही राजू शेट्टींनी सांगितलं. राज्यभरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलनंही करण्यात आले आहेत.