Raigad News: एका बाजूला राज्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला दोन ठाकरे यांचे मनोमिलनाच्या चर्चेला उत आला आहे. असे असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत रोज जोरदार इनकमिंग सुरू आहे. आता शिवसेना ठाकरे गटासोबत एकनाथ शिंदे हे शरद पवार यांना दे धक्का करण्याच्या तयारीत असून ठाकरे सेनेसोबत शरद पवार गटालाही शिंदेंकडून जोरदार हादरे देण्यास सुरुवात झाली आहे.
शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राजीव खरे हे पहिल्यापासूनच शिंदे सेनेची जवळीक साधून होते. आम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांना बोलावू, असे स्पष्ट संकेत काल (11 जून) शिंदे सेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांनी दिल्याने पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. जेव्हा दोन राष्ट्रवादी एकत्र येतील तेव्हा राजू खरे त्यांचा निर्णय घेतील, असे सांगत खरेंच्या प्रवेशाबाबत गोगावले यांनी मुहूर्तही जाहीर केला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे चित्र आहे.
जयवंतराव जगतापांची पवार गटाला सोडचिठ्ठी, शिवसेनेत प्रवेश
दरम्यान, काल (11 जून)मुंबई येथे करमाळा येथील माजी आमदार आणि सध्या शरद पवारांच्या सोबत असणारे जयवंतराव जगताप यांनी पवार गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. जगताप हे करमाळा विधानसभा मतदारसंघातून 1990 मध्ये अपक्ष तर 2004 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत जगताप यांनी शरद पवार गटात प्रवेश करीत येथील महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांना विजयी केले होते. आता जगताप आणि पवारांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. सध्या एकनाथ शिंदे गटात महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र असून शिंदे यांच्या लोकप्रियतेचा फटका काँग्रेस आणि ठाकरे सेनेबरोबर आता शरद पवार गटाला ही बसण्यास सुरुवात झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या