नागपूरः तीस लाखांवर लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात फक्त 3 हजार 165 इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले असून मनपा जनजागृती आणि प्रोत्साहन देण्यास निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे. शहरातील एक टक्के नागरिकांनीही जलसंवर्धनात पुढाकार घेतला नसल्याचे उदासीन चित्र आहे.
नागपूरात सिमेंटच्या बहुमजली इमारती तयार झाल्या. मुख्य रस्त्यांसह वस्त्यांमध्येही सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले गेले. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची जागाच नाही. राज्य सरकारने रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. परंतु महानगरपालिकेने आदेश गुंडाळून ठेवल्याचे दिसते. शहरातील इमारतींची संख्या बघता केवळ अर्धा टक्के नागरिकांनीच जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार न घेतल्यास शहराची भूजल पातळीत प्रचंड घट होऊन स्थिती लातूरसारखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सवलत निर्णय फक्त कागदावरच
रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणाऱ्यांना 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेची पुढे अंमलबजावणी झालीच नाही. लोकांनीही यासाठी आग्रही भूमिका घेतली नाही. मनपा प्रशासनासोबतच पदाधिकारीही उदासीन असल्याने सवलत जाहीर करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
प्रथमच दिवसाआड पाणीपुरवठा
2019मध्ये पेंच प्रकल्पात पुरेसा जलसाठा नसल्याने नागपूर शहराला प्रथमच दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता. यातून नागरिकांनी व प्रशासनाने धडा घेण्याची गरज होती. मात्र नागरिकांत 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची संकल्पना राबविण्याबाबत कमालीची उदासिनता दिसून येते. विशेष म्हणजे यासाठी महानगरपालिकेकडूनही कुठलीही जनजागृती किंवा नागरिकांना सक्ती केली जात नाही. त्यामुळे आजही उन्हाळ्यात अनेक भागातील विहिरी, बोअरवेल कोरड्या होत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. महानगरपालिकेची उदासिनता कायम राहील्यास शहराची भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिसूचनेकडे दुर्लक्ष
आधीच्या काळात छोटे-छोटे तलाव निर्माण करून त्यात पावसाचे पाणी साठविले जायचे. साठलेले पाणी जमिनीत झिरपल्याने भूजल पातळी वाढायची. आता सगळीकडे सिमेंटीकरण झाल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग महत्त्वाचे आहे. राज्य सरकारनेही 6 जून 2007 मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबत अधिसूचना काढली. परंतु याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले.
एक टक्के घरी यंत्रणा नाही
2007च्या राज्य सरकारच्या अधिसूचनेची परिणामकारक अंमलबजावणी होत नसल्याने पुन्हा 15 जून 2016 रोजी अधिसूचना काढली अन् महापालिकांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. परंतु महापालिकेने राज्य शासनाचे निर्देशच धुडकावल्याचे चित्र आहे. शहरात 6 लाख 22 हजार घरांची नोंद असून आतापर्यंत जेमतेम 3165 लोकांनीच ही यंत्रणा उभारली आहे. म्हणजेच एक टक्का नागरिकांनीही रेन वॉटर हार्वेस्टिंग केले नाही.
झोन निहाय आकडेवारी
झोन | इमारती |
लक्ष्मीनगर झोन | 630 |
धरमपेठ झोन | 116 |
हनुमाननगर झोन | 718 |
धंतोली झोन | 685 |
नेहरूनगर झोन | 435 |
गांधीबाग झोन | 36 |
सतरंजीपुरा झोन | 19 |
लकडगंज झोन | 135 |
आशीनगर झोन | 75 |
मंगळवारी झोन | 316 |
एकूण | 3165 |