मुंबई : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत अवकाळी पावसाने राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात धडक दिली. मनमाडमध्ये वीजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.  तर शिरूर आणि बारामतीमध्ये देखील गारपीट झाली.


सातारा, राहुरी, पारनेरमध्येही वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळला. संध्याकाळनंतर जळगावमध्येही पावसाने हजेरी लावली. काल झालेल्या अवकाळी पावसामुळं संगमनेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील इनामगाव येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. इतर दोन गावातील दोन जण वीज पडून जखमी झाले आहेत.

मनमाड जवळच्या पांझनदेव येथील शेतकरी श्रावण डघळे या शेतकऱ्याने शेतात साठवून ठेवलेला हजारो रूपये किमतीच्या चाऱ्यावर वीज पडली. त्यामुळे चारा आगीत भस्मात झाला.

जळगाव- यावल, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. चाळीसगाव तालुक्यात वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला.

अहमदनगर जिल्ह्यात पावसाने मोठं नुकसान

अहमदनगर जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर, पारनेर, राहुरी, शेवगाव आणि श्रीगोंद्यात काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला.

सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पारनेर तालुक्यात कान्हुरपठार निघोज, काळेवाडीत गारपीट झाली तर अनेक ठिकाणी पाऊस पडला.

निघोजला गारपीटीने डाळींबाच्या फळबागांना मोठा फटका बसला.  मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जवळेत रस्त्यावर झाडं पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली. तर शेवगाव तालुक्यात पत्र्याचं शेड पडून दोन म्हशी दगावल्या. मात्र अवकाळी पावसानं असहाय्य उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

बेळगावात वीज पडून महिलेचा मृत्यू

रविवारी सायंकाळी झालेल्या पावसात वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील के के कोप्प येथे घडली आहे.

रुद्रवा चंद्रापा गुडयानट्टी, वय 36 असं मृत महिलेचं नाव आहे. शेतात काम करायला गेली असता वीज पडून या महिलेचा मृत्यू झाला. या महिन्यात वीज पडून मृत्यू झाल्याची सहावी घटना आहे.