मुंबई : सध्या मुंबईकरांना मे महिन्यातल्या उन्हाच्या तडाख्यामुळं पावसाचे वेध लागले आहेत. मात्र जेव्हा प्रत्यक्षात पाऊस सुरु होईल, तेव्हा मुंबईकरांना पाऊस नकोसा वाटले. कारण गेल्या दोन वर्षांपासून नालेसफाई कामातला घोटाळा यंदाही खुलेआम सुरु आहे.


सध्या मुंबई महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामं कासव गतीनं सुरु आहेत. पण या नालेसफाईच्या कामात गाळ नाही, तर चक्क मोठे दडग, सिमेंट,माती यांचं मिश्रण असणारं डेब्रिज उपसलं जातं आहे. विशेष म्हणजे, नालेसफाईच्या नावावर काढलेला हा गाळ ओलसर दिसावा, यासाठी कंत्राटदारांनी ही युक्ती लढवल्याचं बोललं जात आहे.

मुंबईतील भांडुप पूर्वमधला साईनगर नाला, विक्रोळीतील पूर्व नाला आणि टागोरनगरचा भारतनगर नाला ही अशी उदाहरणे आहेत, जिथे कायद्याचा आणि नियमांना धाब्यावर बसवून मुंबईकरांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे प्रकार सुरु आहेत.

गेल्या दोन वर्षात मुंबईचा पावसाळा नालेसफाई घोटाळा आणि रस्ते घोटाळ्यांनी गाजला. त्यामुळं आता खुर्चीवर बसलेले नवे चेहरे या घोटाळ्याचं नेमकं काय करतात ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

कारण घोटाळे उघड झाल्यानंतर कारवाईचं आश्वासन देऊन सत्ताधारी हा विषय आटोपता घेतात. मात्र भ्रष्ट कंत्राटदार आणि त्यांच्यावर मेहेरबानी करणारे खुर्चीसम्राट यांच्यामुळे मुंबईकर दिवसेंदिवस गाळातच रुतत चालला आहे.