Ratnagiri Rain : सध्या राज्याच्या विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नद्यांची पाणी चांगलीच वाढली आहे. कोकणात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार पाऊस झाला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोराचा पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या तुकडीचे प्रमुख बी. महेशकुमार यांच्यासह त्यांच्या सहकारी जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला.
सध्या रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी NDRF च्या जवानांशी संवाद साधला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, तहसिलदार श्री.सुरेश काशीद, महाड नगरपालिका मुख्याधिकारी महादेव रोडगे उपस्थित होते.
NDRF च्या या दोन तुकडीत प्रत्येकी 25 असे मिळून एकूण 50 जवानांचा समावेश आहे. निरीक्षक बी. महेश कुमार आणि महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमधील ही पथके महाड उपविभागात काम करतील. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफचे जवान आणि जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक बचाव व मदतकार्य उत्तम प्रकारे करतील, त्यामुळं रायगडकरांनी विशेषतः महाडकरांनी घाबरु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, एनडीआरएफ पथकाचे निरीक्षक बी महेश कुमार आणि महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड, माणगाव, पनवेल , पेण , मुरुड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 1 हजार 716 रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे.