रायगड: रायगड जिल्ह्यातल्या मोरबे धरणाची (Morbe River) उपनदी असलेल्या धावरी नदीत (Dhavari river) आज दुपारी दोन चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुमारी आराध्या संजय गावडे , आणि आरव विजय गावडे या दोन भावा बहिणींचा धावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे . हे दोघे सकाळी आपली आई आणि काकीसोबत नेहमीप्रमाणे नदीवर कपडे धुण्यास गेले होते. आई आणि काकी कपडे धूत असताना या दोघांनी पाण्यात अंघोळ करण्याच्या बहाण्याने नदीत उडी मारली. आराध्या आणि आरव यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. मात्र, कोणीही त्यांना वाचवायला आले नाही.
या दोघांची काकी शेजारीच कपडे धूत होती. मात्र, दोन्ही लहान मुलं बुडत असल्याचे तिच्या लक्षात आले नाही. कपडे धुवून झाल्यावर तिथे ही मुले दिसतं नसल्याने त्यांनी घरी किंवा शेजारी, कुठे खेळत नसल्याचे दिसल्यावर शोध सुरु केला. त्यावेळी ते पुन्हा नदीवर गेले. मात्र, नदीवर जाऊन पाहणी केली असता कुमारी आराध्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर गावकऱ्यांनी नदीत आरवचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्याचा मृतदेह चिखलात अडकल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर दोघानाही अलिबाग चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. ही दुर्दैवी घटना समजताच परिसरातील नातेवाईक, मित्र परिवार,ग्रामस्थ यांच्याकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. ही नदी अतिशय धोकादायक असून खोल आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना उतार असून सर्व भाग खडकाळ आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी करत आहेत.
आणखी वाचा
हळूहळू घसरली... धरण पाहण्यासाठी सातपुडा पायथ्याशी गेलेल्या तरुणांची कार पाण्यात बुडाली