रायगड: राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसामुळे फळबागा आणि आंबा (mango) उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रायगडसह (Raigad) आज ठाणे जिल्ह्यातील वांगणी, बदलापूरमध्ये पावसाला सुरुवात झाली असून कल्याण-डोंबिवलीत धुळीसह सोसाट्याच्या वाऱ्याने वातावरण फिरल्याचं चित्र आहे. यासह उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आहे. त्यामुळे, संबंधित परिसरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सोसाट्याचा वारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, वांगणी परिसरात सोसाट्याचा वारा सुटला असून एका ठिकाणी पत्रे उडून गेल्याची घटना समोर आली आहे. दुसरीकडे रायगड जिल्ह्यात मागील आठवड्यात आतापर्यंत तीन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटात टाकलं आहे. माणगाव तालुक्यातील लोनेर परीसरात आज दुपारपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळीने आंबा बागायतदार मात्र शेवटच्या फेरीत राहिलेल्या आंबा काढण्यापासून पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा सुटला असून (50-60 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यातच, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि धुळ्यात पुढील 3-4 तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक, पालघर, ठाणे, पुण्यातील घाट परिसर, सातारा जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातही वातावरणात बदल जाणवत आहे, त्यावर हवामान विभाग लक्ष ठेऊन आहे.
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यासोबतच, मुंबई, पालघरमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाजही आयएमडीमने दिला आहे.
यलो अलर्टही जारी
नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात काही भागात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे, सातारा, लातूर, नांदेड जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा