Raigad Suspected Boat : रायगडमधील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीबाबत (Raigad Suspected Boat) मोठी माहिती समोर आली आहे. ही बोट ओमान देशातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्पीड बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती. या बोटीतील व्यक्तींची ओमानजवळच सुटका करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी अशी माहिती सूत्रांनी दिली. या बोटीचा संबंध दहशतवादी कृत्याशी असावा का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीत आढळलेल्या बॉक्सवर कंपनीचे नाव आढळून आले आहे. या कंपनीशी सुरक्षा यंत्रणांनी संपर्क साधला आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत त्यांची नौका पलटी झाल्याची माहिती कंपनीने सुरक्षा यंत्रणांना दिली होती. बोटीतील शस्त्रे त्या कंपनीच्या मालकीची असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्र पोलीस, गुन्हे शाखा आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यात येत आहे.


श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन-तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्या आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात. या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही. ही बोट आढळून आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. 


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. तर, दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट शस्त्रांसह आढळून आल्याने गंभीर बाब समजली जात आहे. पोलिसांनी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


काही स्थानिकांना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बोट समुद्रात अडकल्याचे दिसून आले. काही स्थानिकांनी या बोटीत काय आहे, याची पाहणी केली. स्थानिकांना रायफल आणि बुलेट्स आढळून आल्या. त्यांनी तातडीने  पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तहसीलदारांनी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बोटीवर असलेल्या रायफलच्या बॉक्सवर एका कंपनीचे नाव दिसून आले. ही स्पीड बोट असल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली. 


राज्यात हाय अलर्ट, पोलीस बंदोबस्त वाढवला


रायगडमध्ये समुद्रात बोटीमध्ये काही शस्त्रास्त्र सापडल्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात  आला आहे. रत्नागिरी, पालघर या समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबई, पुण्यात नाकेबंदी सुरू करण्यत आली असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.