Raigad News : रायगड जिल्ह्यात  श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये दोन  ते तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. 


श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्या आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात. या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही. 


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. तर, दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट शस्त्रांसह आढळून आल्याने गंभीर बाब समजली जात आहे. पोलिसांनी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


काही स्थानिकांना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बोट समुद्रात अडकल्याचे दिसून आले. काही स्थानिकांनी या बोटीत काय आहे, याची पाहणी केली. स्थानिकांना रायफल आणि बुलेट्स आढळून आल्या. त्यांनी तातडीने  पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तहसीलदारांनी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बोटीवर असलेल्या रायफलच्या बॉक्सवर एका कंपनीचे नाव दिसून आले. ही स्पीड बोट असल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली. 


घातपाताचा कट?


रायगडमध्ये शस्त्र असलेली बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते. त्याशिवाय, मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्सदेखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. या सगळ्या भूतकाळांतील घटनांचा विचार करता पोलीस प्रशासनाची चिंता वाढली असून तपास सुरू करण्यात आला आहे. 


पाहा व्हिडिओ: Maharashtra : महाराष्ट्रात घातपाताचा प्रयत्न? श्रीवर्धनमध्ये बोटीत 2 ते 3 एके 47रायफल्स आढळल्या