Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra : "गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला, याचं मला दुःख आहे. आपल्याला देश पुढे न्यायचा आहे. आपलं फक्त प्रेम आणि आशीर्वाद हवे आहेत. माणुसकीसोबत गद्दारी झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण त्या गद्दारांनी ठाकरे परिवाराला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला," असा घणाघात शिवसेनेचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांवर केला. 


आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा आज सुरु झाला. आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या रायगड (Raigad) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे गटातील आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे. रायगडमध्ये पोहोचल्यानंतर झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधताना शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली. 


आदित्य ठाकरे म्हणाले की, "मी या देशात पहिलाच आमदार असेन जे राजकारणात बऱ्याच गोष्टी पाहिल्या. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात रायगडला 600 कोटी देण्यात आले आहेत," असं आदित्य ठाकरे म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "आपला गेम झाला हे गद्दारांच्या तोंडावर दिसत होतं. देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री नाहीत. मंत्रिमंडळात रायगडचे कुणी नाही, महिला कुणी नाही. खाते वाटपात निष्ठेला कुठेही स्थान नाही. बंडखोरीच्या वेळी गेलेल्या पहिल्या बॅचमधील खूप कमी जणांना मंत्रीपद मिळालं. 


'ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला' 
शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी केला.हे सरकार बेकायदेशीर आहे, ते कोसळणारच. शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "आमच्यासोबत गद्दारी झाली. पण आम्ही काय चूक केली? गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला, पण त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या रक्तात शिवसेना असती, तर गुवाहाटीला जाऊन मदत केली असती. महापुरातील बाधितांना मदत केली असती.


...तेव्हा पेढे वाटले नसते : आदित्य ठाकरे
दुःख सरकार गेल्याचं नाही, ज्यांना आपलं समजलं ते गोव्यात नाचत होते. हे आपले नेते , लोकप्रतिनिधी होऊ शकतात का? मनात बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेबद्दल काही असतं तर तुम्ही उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला तेव्हा पेढे वाटले नसते. हे सगळे गद्दाराच राहणार , असं त्यांनी शिंदे गटातील आमदारांना उद्देशून म्हटलं. माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाही, हिम्मत असेल तर आमदारकीचं राजीनामा द्या. ज्याला वाटतं शिवसेनेशी केलेली गद्दारी चुकीची आहे, त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. गद्दारांकडून अनेक कारणं दिली जातात. त्याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे 'ईडी' असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.


'ठाकरे कुटुंबाला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न'
शिवसैनिकांसोबत संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की,"शिवसेनेचं हिंदुत्व हे ज्वलंत आहे. आपण आपली भूमिका बदललेली नाही. आपलं हिंदुत्त्व हे प्रत्येकाकडे माणूस म्हणून बघणारं आहे. गद्दारांनी  माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला, याचं मला दुःख आहे. ज्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवला, त्या गद्दारांनी ठाकरे परिवाराला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आणि मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे."