रायगड: एकीकडे रायगडवर शिवराज्याभिषेकाची लगबग सुरू असताना दुसरीकडे नाराजी मानपानावरुन नाराजीनाट्य घडल्याचं दिसून आलं. रायगडवर शिवराज्याभिषेक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्रुटी असल्याचा आरोप करत खासदार सुनिल तटकरे सोहळ्यातून तडकाफडकी निघून गेल्याचं समोर आलं. तर यावर सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना विरोधक नेहमी राजकारण करत असल्याची टीका केली. 


रायगडवरील राज्याभिषेक कार्यक्रमाच्या आयोजनाच्या त्रुटींमुळे खासदार सुनिल तटकरे नाराज असल्याचं दिसून आलं. स्थानिक खासदार असूनही व्यासपीठावर बोलण्याची संधी न मिळाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे. रायगडवरील कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्रुटी असून प्रोटोकॉल पाळला नसल्याचा आरोप खासदार सुनिल तटकरे यांनी केला. सुनिल तटकरे शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिले, पण नंतर ते तडकाफडकी निघून गेल्याचं दिसून आलं. 


खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, "मी एक शिवभक्त म्हणून इथे आलो होतो, शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण होईपर्यंत मी मावळा म्हणून उपस्थित होतो. पण नंतर या कार्यक्रमाला राजकीय स्वरुप प्राप्त झाल्याचं दिसून आलं. प्रोटोकॉल म्हणून स्थानिक खासदारांना बोलू द्यायला हवं होतं, पण मला डावललं गेलं."


Supriya Sule On Sunil Tatkare : सुप्रिया सुळेंनी केली टीका 


सुनिल तटकरे यांना स्थानिक खासदार म्हणून बोलू दिलं नाही, कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉल पाळला गेला नाही, सरकारी कार्यक्रमा असला तरी काहीजणांनी हा खासगी कार्यक्रम असल्यासारखं वर्तन केलं असा आरोप आता राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर सोशल मीडियातून टीकाही केली आहे. 


 







काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं


खासदार सुनिल तटकरे कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर होणाऱ्या टीकेवर राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कार्यक्रम हा सर्वांचाच आहे. पण काही लोकांना यामध्ये फक्त राजकारण करायचं असतं. हा सर्व कार्यक्रम प्रोटोकॉलनुसार झाला आहे. त्यामुळे विरोधकांनी राजकारण करु नये. 


ही बातमी वाचा: