Raigad Rain Update : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर वाढत आहे. हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे आज प्रशासनाकडून सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

Continues below advertisement


रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, नागोठणे येथील आंबा नदीने इशारा पातळी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, आपत्ती व्यवस्थापन पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे. जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


शाळांना सुट्टी जाहीर


रायगड जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा जवळील कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे. तर दुसरीकडे आज वादळी वाऱ्यासहित पाऊस लागण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.


मुसळधार पावसाचा वाहतुकीला फटका


रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते वाहतुकीवर देखील झालाय. सतत सुरु असलेल्या पावसामुळे पाली पोलीस ठाणे हद्दीतील अंबा नदीवरील पाली खोपोली रोडवर नदीचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील उन्हेरे फाटा येथील पुलाजवळ दोन्ही बाजूस नदीचे पाणी शिरल्याने येथील मुख्य पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूची वाहतूक बॅरेगेटींग लाऊन बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये, याकरिता पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. दुसरीकडे सुधागड तालुक्यातील खुरावले फाटा येथील भेराव गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रोडवरील पुलावर देखील पाणी भरल्याने हा मार्ग वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. 


खेडमध्ये पूरस्थिती, जगबुडी नदीची पातळी वाढली


खेड तालुक्यातील घाटमाथ्यावरही पावसाचा जोर अधिक असल्यामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. विशेषतः मटण मार्केट परिसरात नदीचे पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. खेड नगर परिषदेकडून तातडीने सतर्कतेच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत खेड शहरात पावसाचा जोर थोडा कमी असला तरी, घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.


अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज


दरम्यान,  19 जून रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर 20 ते 22 जून या कालावधीत या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यात वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विशेषतः लातूरमध्ये 20 जून रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.


विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.  



आणखी वाचा 


Maharashtra Weather Update: राज्यात मान्सूनचा जोर वाढला; पुढील चार दिवस मुंबई पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, रायगडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर