मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय. यावेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या आधी दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही तसाच एक व्हिडीओ शेअर केला होता.
शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा आणखी एक व्हिडीओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर करण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी घरी अघोरी पूजा करुन घेतली असा दावा यावेळी सूरज चव्हाण यांनी केला. भरत गोगावलेंचा व्हिडीओ पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी भरतशेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का? असा सवाल उपस्थित केला.
मागील काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात शीत युद्ध सुरू आहे. त्यामुळे सूरज चव्हाण यांनी भरत गोगावलेंच्या शेअर केलेल्या व्हिडीओला रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादाची किनार असल्याची चर्चा सुरू आहे.
Bharat Gogawale Aghori Puja : वसंत मोरेंनीही व्हिडीओ शेअर केला
या आधी वसंत मोरेंनीही भरत गोगावलेंवर अशाच स्वरुपाचे आरोप केले आहेत. भरत गोगावलेंनी निवडणुकीच्या वेळी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला. 17 ऑक्टोबर 2024 रोजी बगलामुखी मंदिरातून 11 पुजारी बोलावून भरत गोगावलेंनी पूजा केल्याचा आरोप त्यांनी केला. एवढंच नाहीतर राज्यातून मांत्रिक आणून गोगावले अघोरी पूजा घालायचे असा आरोप वसंत मोरेंनी केला. गोगावलेंचे पूजेचे व्हिडीओही त्यांनी शेअर केले आहेत.
तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का? मग अशा पूजांचा आधार का घेतला? असा सवालही वसंत मोरे यांनी भरत गोगावलेंना केला. या पूजेसाठी इतर राज्यातून मांत्रिक बोलावण्यात आले आणि त्या पूजेचे व्हिडीओ आमच्याजवळ उपलब्ध आहेत. जर गोगावले यांनी हे नाकारले तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करू असा इशाराही वसंत मोरेंनी दिला.
... तर पालकमंत्रिपदासाठी केले असते, गोगावलेंचे प्रत्युत्तर
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी केलेले आरोप शिंदेंचे आमदार भरत गोगावलेंनी फेटाळले. मला अघोरी पूजा करायची असती तर पालकमंत्रिपदासाठीच केली नसती का असा प्रतिसवाल गोगावलेंनी केला. आम्ही पंढरपूर, सिद्धीविनायक, स्वामी समर्थांच्या मंदिरात प्रार्थना करतो. त्यामुळे अघोरी पूजा वगैरे काही करत नसल्याचं भरत गोगावलेंनी म्हटलं.