Latest News on Matheran : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ई- रिक्षेची चाचणी माथेरान येथे लवकरच करण्यात येणार आहे. यामध्ये न्यायालयीन निर्णयाच्या आधीन राहून ई- रिक्षेची एक दिवसीय चाचणी घेण्यात येणार आहे. मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेले माथेरान हे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड येथील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तर, राज्यातील अनेक पर्यटक हे थंड हवेचे ठिकाणी असलेल्या माथेरानला हजेरी लावत असतात. यामध्ये, माथेरानचे निसर्गरम्य वातावरण घनदाट झाडी, घोडे हे चिमुरड्या बालकांपासून तरुण आणि वृद्धांचे आकर्षण बनले आहे.
त्यातच, माथेरान हे इको- सेन्सिटिव्ह क्षेत्र असल्याने या परिसरात वाहनांना बंदी असल्याने मिनिट्रेन, घोडे आणि हातरिक्षा हे प्रवासाचे साधन आहे. तर वृद्ध आणि ज्येष्ठ पर्यटकांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी हातरिक्षा ओढण्यासाठी किमान तीन व्यक्तींची आवश्यकता असते. तर , गेल्या सुमारे १५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या या अमानवी पद्धतीला अनेक सामाजिक संघटनांचा विरोध असून याऐवजी पर्यावरण पूरक असलेली ई- रिक्षा सुरू करण्याची मागणी स्थानिक रहिवासी आणि हातरिक्षा चालकांकडून करण्यात येत होती. हातरिक्षेच्या या संपूर्ण प्रवासात ती ओढणाऱ्या चालकांना शारीरिक त्रास करावा लागत असल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे . तर, गेल्या सरकारच्या कालावधीत नितीन गडकरी यांनी देखील सुमारे दहा वर्षांपासून हातरिक्षा चालकांकडून करण्यात येणारी 'ई - रिक्षे'ची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वेळा यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला असून संनियंत्रण समिती सदस्य सचिव जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार ' ई- रिक्षे' संदर्भात चाचणी पूर्व बैठक घेण्यात आली. यावेळी, नगरपालिकेला तांत्रिक बाबतीत मार्गदर्शन, सल्ला आणि शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
यावेळी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी , माथेरान वनविभागाचे क्षेत्रपाल, मुख्याधिकारी, निवासी उप जिल्हाधिकारी पद्मश्री बैनागडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये लवकरच 'ई- रिक्षे'ची एक दिवसीय चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले असून तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात येणार आहे. यामुळे, माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी महत्वाच्या निर्णयातील एक टप्पा लवकरच घेण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता संनियंत्रण समिती आणि माथेरान नगरपरिषद करत आहे. यामुळे, गेल्या सुमारे १५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित प्रश्नावर तोडगा निघणार असल्याने माथेरानमधील हातरिक्षा चालकांना 'अच्छे दिन' येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.