Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) इंदापूर शहराजवळ कोकणाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन वाहनांचा विचित्र अपघात (Accident News) झाल्याची बातमी समोर येत आहे. महामार्गावरील इंदापूर जवळ असलेल्या कशेने गावाजवळ पडलेल्या खड्ड्यांमुळे हा विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या खड्ड्यात एका कार चालकाने खड्ड्यांचा अंदाज घेत अचानक ब्रेक मारला, मात्र मागून वेगवान येणारी दोन वाहने या कारवर आदळली आणि हा अपघात घडला. या अपघातात तिन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून एअर बॅग उघडल्यामुळे या वाहनातील प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत.

Continues below advertisement

सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर शिंदेच्या सेनेकडून संताप व्यक्त करण्यात आला असून लवकरात लवकर खड्डे बुजवा, अन्यथा कार्यालय फोडू असा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला आहे.

Western Express Highway : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू 

Continues below advertisement

दुसरीकडे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) मालाडजवळ (Malad) एक भीषण अपघात झाला असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास एका भरधाव डंपरने बाईकला धडक दिल्याने हा अपघात घडला. बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर झालेल्या या अपघातात बाईकवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मुंबईतील रात्रीच्या वेळेतील अवजड वाहनांच्या वेगाचा आणि रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Container Fire : दिल्लीहून चेन्नईकडे निघालेला कंटेनरचा अपघात; 40 फ्रीजसह कंटेनर जळून खाक

तर हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी-नांदेड महामार्गावर (Kalamnuri-Nanded Highway) दातीपाटीजवळ एका कंटेनरला भीषण आग लागली. दिल्लीहून (Delhi) चेन्नईच्या (Chennai) दिशेने 40 फ्रीज घेऊन निघालेल्या या कंटेनरच्या केबिनमधून अचानक धूर येऊ लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ कंटेनरमधून बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. या आगीच्या घटनेत संपूर्ण कंटेनर आणि त्यातील 40 फ्रीज जळून पूर्णपणे खाक झाले आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, या दुर्घटनेत कंटेनरचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

इतर बातम्या