रायगड : पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आणि पर्यटनाचा मोह सर्वांनाच होतो. मात्र, कधी कधी आपल्या आतातायीपणामुळे किंवा गरम जोशीमुळे ही पर्यटन यात्रा जीवावर बेतते. गेल्या महिनाभरात पर्यटनस्थळी, किंवा धबधब्याच्या ठिकाणी तोल जाऊन, सेल्फी घेताना किंवा पाण्यात उतरल्यानंतर मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, पुणे, सातारासह विविध पर्यटनस्थळी या दुर्घटना घडल्याचं दिसून आलं. आता, रायगड जिल्ह्यातील महाड येथे अशीच एक दुर्घटना घडली असून तीन जणांचा सावित्री नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर येथून हे तीन मित्र फिरण्यासाठी महाडला आले असता, ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये 2 सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
 
महाड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या, सव येथील गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी आलेल्या तीन पर्यटनांचा सावित्री नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सव येथील गरम पाण्याचे कुंड हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, या कुंडांवर राज्यभरातून अनेक पर्यटक भेट द्यायला येतात. महाबळेश्वर येथून आज पर्यटनासाठी आलेले तीन पर्यटक या गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी आले होते. मात्र, हे कुंड पाहायला जाण्यापूर्वी येथील सावित्री नदीत पोहण्याचा मोह तिघांना झाला. त्यामुळे, गरम पाण्याचे कुंड पाहिल्यानंतर नदीपात्रात ही दुर्घटना घडली. याबाबत माहिती मिळताच, स्थानिक व प्रशासनाच्या मदतीने शोधमोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये, तिघांचेही मृतदेह बचाव पथकाला आढळून आले आहेत. 


महाबळेश्वरहून महाडच्या सौ. गाव येथील दर्गाचे दर्शन घेण्यासाठी हे तीन पर्यटक आले होते. दर्गाचे दर्शन घेतल्यानंतर यातील एक युवक या दर्गाजवळ असलेल्या सावित्री नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेला होता. अंदाज चुकल्याने तो बुडू लागला, तेंव्हा दुसरा मुलगा नदीत उतरला. तोही बुडायला लागल्यामुळे तीसरा युवकही नदीत उतरला. मात्र, दुर्दैवाने हे तिघेही नदीत बुडाले. या तीघांना टीम सिस्केप महाड नगरपालिका साळुंखे रेस्क्यू टीमने बाहेर काढले. त्यांचे मृतदेह आता शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. महाबळेश्वर येथून फिरण्यासाठी आलेल्या या तिन्ही पर्यटकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. दिलावर नालबंद, जहिद पटेल आणि मुनावर नालबंद, अशी तिघांची नावे आहेत. याप्रकरणी, पोलिसांनी पंचनामा करुन मृत्यूची नोंद केली आहे.


हेही वाचा


महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उमेदवाराच्या पाठिशी विशाल पाटलांचा हात, जाहीर पाठिंबा 


लाडक्या बहि‍णींना द्या 'स्मार्ट' गिफ्ट; ओप्पोचा 5जी K12x फोन, स्वस्तात मस्त फिचर्स जबरदस्त