Konkan Rain News : कोकणात पावसाचा (Rain) जोर वाढताना दिसत असून, रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यात उत्तर आणि दक्षिण भागांत जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेन, मुरुड आणि रोहा तालुक्यांमध्ये मुसळधार पावसासोबतच वाऱ्याचा जोर वाढलेला असून, या भागांत अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख सहा नद्यांच्या पातळीत हळूहळू वाढ होत असल्यामुळे संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पेन तालुक्यातील भोगावती नदीची पाणीपातळी वाढण्याची चिन्हं आहेत. रायगडच्या दक्षिण भागामधील श्रीवर्धन म्हसळा  मुरुड परिसरात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय. श्रीवर्धन मसाला बाजारपेठेत पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

रत्नागिरीत पावसाचा कहर

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये वशिष्ठी नदी पात्र भरून वाहत असून जुन्या बाजार पुलाजवळ पाणी साचले आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. चिपळूण शहरात रिपरिप सुरू असली तरी आजूबाजूच्या भागांत मुसळधार पावसामुळे वातावरण चिंताजनक बनले आहे. खेड तालुक्यात जगबुडी व नारंगी नद्यांना पूर आला आहे. नारंगी नदीचं पाणी खेड-दापोली मार्गावर आल्याने वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. चिपळूण आणि खेड नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. काल पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. मात्र आता कणकवली मध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडनदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीचे पाणी कणकवली मालवण राज्य मार्गांवर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही वाहन चालक त्याच पाण्यातून वाट काढत जातं आहेत. जिल्ह्यात आज देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहवं अस आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत 86 मिमी पाऊस जिल्ह्यात कोसळला असून सर्वाधिक 172 मिमी पाऊस कणकवलीत कोसळला आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 17 ते 21 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा असून, पुढील 24 तास कोकणासह घाटमाथ्यावर धोका कायम आहे.

रेड अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा

ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, मुंबई, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा घाट, कोल्हापूर घाट

या काळात समुद्र खवळलेला राहील तसेच ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रशासन सज्ज; नागरिकांनी घ्यावी काळजी

राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संभाव्य भूस्खलन, पूर परिस्थिती आणि वाहतूक अडथळ्यांचा विचार करून आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदीकाठच्या व डोंगराळ भागांत जाणे टाळावे, व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा 

Nanded Heavy Rain: रावणगाव साखरझोपेत असताना आभाळ फाटलं, नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, सहा गावं पाण्याखाली