रायगड :  दहीहंडीच्या (Dahihandi)  उत्साहाने राज्यात चौकाचौकात गोविंदांचा आज जल्लोष पाहायला मिळतोय. सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने आज कृष्णजन्मोत्सव साजरा करतायत. रायगड (Raigad)  जिल्हयातील सुधागड तालुक्यातील एक अनोखी प्रथा समोर आली आहे. यामध्ये गोविंदाच्या अंगावर चक्क आसुडाचे फटके मारले जातायत.  या गावात  दहीहंडी साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि रिती आहेत. मात्र अंगावर आसुडाचे फटके मारून दहीहंडी साजरी करणारी आगळीवेगळी प्रथा  सुधागड तालुक्यातील जांभूळ पाडा येथे पाहायला मिळते. 


अतिशय वेगळ्या प्रकारे पारंपारिक पद्धतीने हा उत्सव या जांभूळ पाडा गावात साजरा केला जातो. येथे गोविंदांच्या अंगात कान्होबाचे वारे येते आणि हे सर्वजण घुमायला सुरुवात करतात. महिला त्यांची पूजा अर्चा करतात आणि मग गोविंदा आसुडाचे फटके अंगावर मारून घेत गावभर फिरतात. ही परंपरा केव्हापासून सुरु झाली हे सांगता येत नाही. मात्र मागील कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपली आहे.


आसुडाचे फटके मारत दहीहंडी फोडण्याची प्रथा


प्रत्येक गावात अथवा जिल्ह्यात सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही ठिकाणी कृष्णजन्मावेळी रात्री 12 वाजताच दहीहंडी फोडली जाते. कोकणातील एका गावात विहीरीवर दहीहंडी बांधून ती फोडण्याची प्रथा आहे. या सर्व प्रथांमध्ये आसुडाचे फटके मारत दहीहंडी फोडण्याची प्रथा पाहून अनेक जण थक्क झालेत.


राज्यभरासह देशभरात दहीहंडीचा उत्साह


सध्या राज्यभरासह देशभरात दहीहंडीचा उत्साह पहायला मिळतोय. मुंबईमध्ये तर सकाळपासून गोविंदा पथकं दहीहंडी फोडण्यासाठी मार्गस्थ झालीयेत. आज सकाळी मुंबईतील आयडियल कॉलनीत सकाळी  9 वाजल्यापासूनच गोविंदा पथकांनी थर लावायला सुरु केली. यावेळी गोविंदांच्या सुरक्षेसाठीही प्रशासनानं खबरदारी घेतलीये. तसंच यावेळी लाखोंची बक्षिसंही ठेवण्यात आली आहेत.  


ठाण्यात गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी चुरस 


जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला ठाणे येथे संस्कृती दहीहंडी उत्सवात रोख 25 लाखाचे पहिले पारितोषिक दिलं जाईल. 9 थरांसाठी 11 लाखांचं बक्षीस दिलं जाईल. प्रत्येकी 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 5 लाख आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. त्याशिवाय 8 थर, 7 थर, 6 थर, 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकांनाही पारितोषिकं जाहीर झाली आहेत. तसंच मुंबई, ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मानसन्मान दिला जात आहे. 


हे ही वाचा :


भर मंचावर शड्डू ठोकला, दंड बैठक मारल्या, पावणं जेवला काय म्हणत गौतमीने प्रकाश सुर्वेंची दहीहंडी गाजवली