पुणे : पुण्यातील पेरणे फाटा येथील महाविद्यालयीन तरुणाने मोबाईल गेमच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवाकर ऊर्फ संतोष धनपाल माळी (19) असे या तरुणाचे नाव आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माळी कुटुंब नोकरीनिमित्त पेरणेफाटा येथे स्थायिक झाले आहे. दिवाकर वाघोली येथील महाविद्यालयात बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. परंतु अलीकडे तो दिवसरात्र मोबाईलवर गेम खेळत असे. गेल्या दोन दिवसांपासून तो कॉलेजलाही गेलेला नव्हता.

दिवाकरच्या आत्महत्येनंतर त्याच्या घरात एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत 'आवर सन विल शाईन अगेन', 'पिंजऱ्यातील ब्लॅक पॅंथर फ्री झाला, तो आता कसल्याच बंधनात राहिला नाही', 'दी एंड' असा मजकूर तसेच कसलासा कोड लिहिलेला आढळला.

या घटनेत पोलिसांनी दिवाकरचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. नेमक्‍या कोणत्या गेममुळे ही घटना घडली? याचा तपास पोलीस करत आहेत. दिवाकरच्या व्हॉट्‌सअॅप आणि फेसबुकवरील डिपीवर(डेस्कटॉप पिक्चर/प्रोफाईल फोटो) मोबाईल गेममधील 'ब्लॅक पॅंथर' या कॅरेक्‍टरचा फोटो होता.

गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, मुलाचा डोळा निकामी



शहरी भागातील तरुण पिढी सध्या ब्लू व्हेल आणि पबजी यांसारख्या धोकादायक मोबाईल गेम्सच्या विळख्यात अडकली आहे. ब्लू व्हेल गेममुळे देशभरात आतापर्यंत अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलंदेखील या गेम्सच्या विळख्यात सापडू लागली आहेत.