पुणे : माहिती अधिकारामुळे आता कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळणं सोपं झाल आहे. नुकताच माहिती अधिकारात एक वेगळा प्रश्न विचारण्यात आला आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये राहणाऱ्या सचिन धनकुडे यांनी राज्य उत्पादन शुल्क पुणे कार्यालयाला माहिती अधिकारात चक्क सांगा दारु प्यायची कुठे? हा प्रश्न विचारला आहे. यावर मद्य परवाने हे वैयक्तिकरित्या मद्य सेवनाकरता असल्याने मद्य सेवन कोणत्या ठिकाणी करावे याबाबत उल्लेख नाही असं उत्तर त्यांना माहिती अधिकारात मिळाल आहे.
दरम्यान, सचिन धनकुडे यांच्याकडून कोथरुड डेपो येथे 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत या, बसा आणि प्या या उपक्रमाचे आयोजन केले आहे. आयोजकांच्यावतीने मसाला दूध मोफत देण्यात येत आहे. जर कोणी मद्य सेवन करणारे असतील तर त्यांनी त्यांच्या पैशातून आणलेली दारु प्यावी असे सांगण्यात आले आहे.
माहिती अधिकारात विचारलेला प्रश्न
उघड्यावर दारू पिणे ही प्रत्येक शहरातील एक समस्या झाली आहे. पुणे मनपाचे बाकडे, बस स्टॉप, सोसायटीतील पार्किंग, वाचनालये याठिकाणी दारु पीत असल्याचे चित्र पुण्यातील कोथरुड भागात दिसत आहे. त्यामुळे आम्ही माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला होता की, दुकानातून दारु घेतल्यानंतर प्यायची कुठे? त्यावर आम्हाला उत्तर आले आहे की, दारु कुठे प्यायची यासाठी नियम नाहीत. त्यामुळे मोकाट पाहिजे तिथे दारु पित असल्याचे सचिन धनकुडे यांनी सांगितले. मात्र, उघड्यावर दारू पिणारांचा त्रास हा सामान्य नागरिकांना, महिलांना, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. त्यामुळे उघड्यावर दारु पिऊ नका असे आवाहन सचिन धनकुडे यांनी केले आहे.
दरम्यान, आम्ही दारुच्या बाटल्या लावून याठिकाणी हे मद्यालय सजवले आहे. ज्याला दारू प्यायची आहे, त्यांनी या ठिकाणी येऊन दारु प्यावी. मात्र, उघड्यावर म्हणजे मनपाचे बाकडे, बस स्टॉप, सोसायटीतील पार्किंग, वाचनालये याठिकाणी दारु पिऊ नये असे आवाहन सचिन यांनी केले आहे. आम्ही दारुला विरोधच करतो. मात्र, या दारू पिणाऱ्या नागरिकांसमोर आम्ही पर्याय ठेवला आहे. त्यांना आमची विनंती आहे की, उघड्यावर दारू पिऊ नका. जे दारू पित नाहीत, त्यांना दूध देण्याची व्यवस्था केली असल्याचेही सचिन धनकुडे यांनी सांगितले.
महत्त्वाची बातमी:
- Ind vs SA, 1st Test : पहिल्या कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय, 113 धावांनी सामना जिंकत मालिकेतही 1-0 ची आघाडी
- MPSC विरु्द्ध सोशल मीडियावर लिहाल तर परीक्षेला बसू देणार नाही, आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांचा संताप