बारामती: बारामतीमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्क मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. जवळपास अर्ध्या तास थांबल्यानंतर आतमध्ये सोडले नाही अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऑफिसकडून देण्यात आली आहे.


शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये जात होत्या. त्यांची गाडी गेटवरती आल्यानंतर गेट लावण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवलं होतं. त्यांची गाडी आतमध्ये सोडली नाही. या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याची माहिती आहे. अर्ध्या तासांनंतर पुन्हा त्यांना आत सोडलं गेलं.


अडवल्याचा व्हिडीओ आला समोर?


प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना अडवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रतिभा पवार आपली नात रेवती सुळेंसह शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये आल्या होत्या. त्यांची गाडी गेटवर आल्यानंतर अडवण्यात आली, त्याचबरोबर गेट पुढे केलं असा दावा व्हिडीओमध्ये केला जात आहे. तर गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकाला त्यांनी याबाबत प्रश्न विचारले असता ,त्यांनी जास्त काही उत्तर दिली नसल्याचं दिसून आलं. आम्हाला वरुन आदेश आलेत, फोन आला, त्यामुळं गेट लावलं असं गेटवर तैनात असलेला सुरक्षा रक्षकाने यावेळी सांगितल्याचं दिसून येत आहे.






या व्हिडिओमध्ये प्रतिभा पवार सुरक्षा रक्षकाला प्रश्न विचारत होत्या, तुम्ही आम्हाला पाहून गेट बंद केलं का? तुम्हाला गेट बंद करण्यासाठी कोणी सांगितलं. आम्हाला पाहून तुम्ही गेट बंद केलं आहे का? तुम्हाला कोणाचा फोन आला? आतमधील दुकाने बंद आहेत का? आमची गाडी आल्यावर गेट बंद केलं का? आम्ही चोरी करण्यासाठी आलेलो नाही, आम्हाला शॉपिंग करायची आहे. . आम्हाला त्या बॅगच्या शॉपमध्ये जायचं आहे. आम्हाला शॉपिंग करायची आहे असं त्या व्हिडिओमध्ये बोलल्याचं दिसत आहे. 


अर्ध्या तासांनंतर सोडलं आत


अनेक प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर जवळपास अर्ध्या तासांनी सुरक्षारक्षकाने सोडलं. जवळपास त्या अर्धा तास गेटवरचं थांबवण्यात आलं होतं. मात्र, या अडवणुकीचे कारण समजू शकलेलं नाही. बारामतीमध्ये याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. नक्की त्यांना अडवण्याचं काय कारण असावं याबाबतचे तर्क वितर्क देखील लावले जात आहेत.