Punyeshwar temple and mosque issue: पुण्यातील पुण्येश्वर,नारायणेश्वर मंदिराच्या जागी आता मशिदी आहेत, असं वक्तव्य मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केलंय. 22 मे रोजी झालेल्या राज ठाकरेंच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काशीतील ज्ञानवापी मंदिराप्रमाणेच पुण्यातही मंदिराच्या जागेवरच मशिदी झाल्या आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. अजय शिंदेच्या या विधानामुळे आता सांकृतिक राजधानी असलेल्या पुण्यात नवा वाद निर्माण झाला आहे. 

Continues below advertisement

इतिहासकार काय सांगतात?

या संदर्भात इतिहासकार संजय सोनावणी यांनी अधिक माहिती दिली. अफगानिस्तानच्या घोरीने दिल्लीवर आक्रमण केल्यानंतर त्याच्या काळात दोन मुस्लिम संत पुण्यात आले होते. संत असल्यामुळे त्यांचे दर्गे बांधल्या गेले. तिथे उरुस होत आहे. ही परंपरा सातशे वर्षांपासून सुरु आहे.पुण्येश्वराचं मंदिर होतं किंवा नारायणेश्वर मंदिर होतं हे दावे केले जात आहेत, ते हास्यास्पद आहे. पुण्याचं नाव पुनवडी होतं. तर पुण्येश्वरावारुन जर हा दावा केला जात असेल तर हे चुकीचं आहे. लोकसंख्या वाढल्यानंतर पुनवडीचं पुणे या नावात रुपांतर झालं. हा पुणे नावाचा इतिहास आहे. पुण्येश्वरचा आणि पुण्याचा काहीही संबंध नाही.ते मुस्लिम संत इथे आले ते राहिले इथे त्यांनी चमत्कार केले असंही बोललं जातं. मात्र त्यांच्यासाठी हे दर्गे बांधल्या गेले हे खरं आहे, असं इतिहासकार संजय सोनावणी यांनी सांगितलं आहे. 

Continues below advertisement

ते म्हणतात, पुण्यात शहाजी महाराजांचं राज्य होतं. त्यानंतर शिवाजी महाराज याच परिसरात रहायला आले. तरीही त्यांनी हिंदू मंदिर तोडून दर्गे बांधले, असा कोणताही दावा किंवा आक्षेप घेतल्याचं दिसत नाही. पेशव्यांनी शनिवार वाडा बांधला. त्यानंतरही काही आक्षेप नोंदवला गेला नाही.उलट 1968साली थोरले माधवराव पेशव्यांनी 1000 रुपयांची देणगी पुण्येश्वराच्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी दिली होती. असे पुरावे पेशवे दफ्तरमध्ये देण्यात आले आहे. याचाच अर्थ पेशव्यांनीसुद्धा यासंदर्भात कारवाई केल्याचं दिसत नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

या नंतरच्या काळात 18व्या शतकात पुण्याची बखर चैन्नईला मिळाली. ती फार विश्वसनीय मानली जात नाही. त्यांनी  एक दंतकथा लिहिली आहे. त्या दंतकथेच्या आधारावर हा दावा इतिहासकार करत आहेत. मात्र तो दावा विश्वसनीय नाही. त्या बखरीच्या आधारावर असे दावे करणे योग्य नाही, असंही ते म्हणाले.

खरंच मंदिर होतं की मशिद?

10 वर्षांपुर्वी तिथे मशिद होती. त्याचं खोदकाम करताना भूमिगत गटाराचे अवशेष मिळाले. त्या गटाराच्या अवशेषाला किंवा विटाच्या कमानीला मंदिराते अवशेष म्हणून जाहीर करायचं हा असा उपद् व्याप दुर्देवाने केला जात आहे. त्या ठिकाणी दर्गेच होते. मंदिरं असल्याचा प्रश्नच येत नाही. धार्मिक पोथीतसुद्धा याचा उल्लेख नाही. त्यासाठी वाद निर्माण करण्याची काहीच गरज नाही आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशात ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला होता.त्यानंतर मशीद व्यवस्थापनाने हा दावा फेटाळून लावला. त्यानंतर आता पुण्यातही तसाच वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. एवढंच नाही तर त्याविरोधात मनसेकडून लढा उभारण्यात येईल, सरचिटणीसांनी दिला आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.