पुणे : कोरोना महामारीच्या नकारात्मक काळात महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आलीय. सर्वजण वाट पाहणाऱ्या मान्सूनचं अखेर राज्यात आगमन झालंय. राज्यात मान्सून अलिबाग, रायगड, पुणे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोहचला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शेतीकामाला वेग येणार आहे. तर दुसरीकडे पावसाळा येत असल्याने कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.
राज्यात यंदा वेळेच्या आधी मान्सूनचं आगमन
काही दिवसांपासून केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. यंदा मान्सून केरळात सामान्य वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, केरळमध्ये वर्दी दिल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. 11 जून रोजी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, त्याआधीच मान्सून राज्यात दाखल झाल्याची माहिती हवामाने विभागाने दिलीय. केरळमध्ये सामन्यत: 1 जून रोजी मान्सून दाखल होतो. परंतु, यंदा दोन दिवस उशिरा वरुणराजाने हजेरी लावली. याआधी आयएमडीने यंदा मान्सून केरळमध्ये 31 मे म्हणजेच चार दिवस आधी पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता.
येत्या 2 दिवसात देशाच्या बर्याच भागात पाऊस होण्याची शक्यता
येत्या दोन दिवसांत देशाच्या बर्याच भागात थोड्या-फार प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे. भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान वार्षिक पावसाच्या 70 टक्के पाऊस पडतो. यावर्षी हवामान खात्याकडून देशभरात सामान्य हंगामी पावसाची अपेक्षा आहे. आयएमडीनेही या जूनमध्ये सामान्य पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आयएमडीने सांगितले की, येत्या पाच दिवसांत देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही.
ताज्या अंदाजानुसार, आयएमडीने येत्या 5 दिवसांत ईशान्य राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात 10 जूनपर्यंत पावसाची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवस देशाच्या दक्षिण द्वीपकल्पित किनाऱ्यावर गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत देशाच्या वायव्य भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.