Shivrajyabhishek Din 2021 : छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार नेमका कसा चालला पाहिजे याचा एक आदर्शच प्रस्थापित केला. राजा कसा असावा, याचं ते मूर्तीमंत उदाहरण. अशा या राज्याला अभिवादन करत शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात रविवारी एका पत्रकार परिषदेला संबोधित केलं. 


राजा कसा असावा, रयतेचे काम कसे करावे हे आपल्या पहिल्या राजाने दाखवून दिलं; त्यामुळं शिवराज्याभिषेक दिन हा सार्थ अभिमानाचा दिवस आहे असं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (6 जून 1674) संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळात, 2016 साली पहिला ठराव हा पुणे जिल्हा परिषदेकडून आला. जिल्हापरिषदेत आजच्या दिवशी गुढी उभारायची मागणी होती. त्याला तेंव्हाच संमती दिली होती पण आज खऱ्या अर्थाने मुहूर्तस्वरूप आलं असं म्हणत अजित पवार यांनी समाधानाची भावना व्यक्त केली. 


Shivrajyabhishek Din 2021 :  जीव वाहतो जीव लावतो, जीव रक्षितो ऐसा राजा; रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न 


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय म्हणाले अजित पवार 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला आहे तो लक्षात घ्यावा पण, सध्या मात्र समाजाला भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी खंत त्यांनी व्यक्त तेली. 'आजच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्वाही देतो, की कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे', असं ते म्हणाले. 


अजित पवार ऑन पालिका निवडणूक
मागील काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बऱ्याच चर्चा पाहायला मिळात आहेत. त्याच बाबत वक्तव्य करताना 'मुंबईत एक सदस्य वॉर्ड पद्धत राहणार, पण इतर शहरात काय निर्णय असेल हा सर्व पक्षांशी मिळून घेऊ. आजच्या तारखेला दोन सदस्य वॉर्ड पद्धत असावी अशी वैयक्तिक भूमिका आहे. पण पुढं चर्चेत ती बदलू ही शकते', असं ते म्हणाले. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार असतो. त्याअनुषंगाने खासदार संजय राऊत हे ऐंशी जागांबद्दल बोलले असतील असं म्हणत राऊतांच्या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 


अजित पवार ऑन पेट्रोल-डिझेल कर
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बरेच खटके उडत आहेत, तर तिथे सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचे परिणाम होत आहेत. त्याचबाबतच प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला. 'राज्यावर गेल्या वर्षभरापासून आलेला आर्थिक भार आणि त्यातच केंद्रातून एक लाख कोटींचा निधी आलेला नाही. त्यामुळं पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याचा राज्य सरकार तूर्तास तरी कोणत्याही विचारात नाही', असं ते म्हणाले.