पुणे: राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी धो-धो पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. साताऱ्यात घाट माथ्यावर अतिमुसळधार तर इतर भागात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर आज पुण्याला (Pune Rain) मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


पुणे शहर परिसरात सोमवारपासून पाऊस सुरूच



आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी रात्रीपासून शहर परिसरात संततधार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी रात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालेले दिसून आले. शहरातील मध्य भागात पावसाचा (Pune Rain) काहीसा जोर दिसून आला, तर  शिवाजीनगर परिसरात 24 तासांत सरासरी 15.5, तर चिंचवडमध्ये 39 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील चारही धरणांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.


मान्सून सुरू झाल्यापासून पुणे शहर परिसरात पहिल्यांदाच चोवीस तास पावसाची संततधार सुरू होती. पावसाचा जोर कमी असल्याने सोमवारी 11.5, तर मंगळवारी 4.5, असा 24 तासांत एकूण 15 मिमी पाऊस शिवाजीनगर भागात झाला.


जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी


पुणे शहरात (Pune Rain) 24 तासांपासून संततधार पावसाने बळीराजा देखील सुखावला आहे. लोणावळ्यात 134, तर चिंचवडमध्ये 39.5 मिमी पावसाची नोंद झाली, तर जिल्ह्यात मध्यम पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील बहुतांश भागांत मुसळधार ते मध्यम पावसाने (Pune Rain) हजेरी लावली. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड भागातही संततधार पाऊस सुरू होता. शहरात सोमवारी रात्री पाऊस सुरू झाला तो मंगळवारी रात्रीपर्यंत सुरूच होता. पाऊस संथगतीने पडत असल्याने शहरात 15, तर चिंचवड भागात 39.5  मिमीची नोंद झाली. 24 तासांत लोणावळा येथे 134 मिमी पावसाची नोंद झाली.


जिल्ह्यात 24 तासांतील पाऊस 



 लोणावळा 134, लवासा 134, निमगिरी 58, चिंचवड 39.5, माळीण 34.5, खेड 25.5, तळेगाव 23, एनडीए 21, राजगुरुनगर 17, वडगाव शेरी 14, दापोडी 13.5, पाषाण 12.2, शिवाजीनगर - 15, तळेदाव ढमढेरे 7, हडपसर 6.5.


खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना



खडकवासला (Khadakwasla Dam) हे धरण तुडुंब भरले असून  या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.  सकाळी साडेसहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाकडून नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.