पुणे : बीड जिल्ह्यातील सरंपच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मास्टरमाईंड असा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik Karad) आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. केज तालुक्यातील एका खंडणीप्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल असून राजकीय व सामाजिक दबाव वाढल्यानंतर वाल्मिक कराडने आज पुण्यातील (Pune) सीआयडी कार्यालयात समर्पण केले. त्यानंतर, सीआयडी पोलिसांनी (Police) प्राथमिक चौकशी करुन आरोपीला बीडच्या सीआयडींच्या ताब्यात दिले आहे. मात्र, वाल्मिक कराड पुण्यात आल्याची माहिती मिळताच त्याच्या समर्थकांनीही पुणे गाठलं होतं. यावेळी, काही पुण्यातील, अहमदनगरमधील व काही परळीतील त्याच्या कार्यकर्त्यांनी देखील पुणे हजेरी लावली. यावेळी,माध्यमांशी संवाद साधताना वाल्मिक अण्णाला राजकीय हेतुने या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचं त्याच्या कार्यकर्त्याने म्हटलं आहे.  


वाल्मिक कराड यांच्यावर एकही गुन्हा नाही, आम्हाला पुरावा दाखवा. आम्हाला कुठून ना कुठून तरी कळणार ना, त्यानुसार अण्णा पुण्याला येत असल्याचे कळताच आम्ही इकडे आलं. अण्णा आरोपी नाहीत, राजकीय हेतूने हे होत आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यामुळे हे सगळं होतंय. बीड जिल्ह्यातले आमदार आहेत, जे ह्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून हे राजकारण करत आहेत. ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी वाल्मिक अण्णा उज्जैनला होते. मग, 302 मध्ये काय उज्जैनहून चाकू मारला काय, असा सवाल कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे. 


ज्या दिवशी गुन्हा घडला, त्यादिवशी वाल्मिक अण्णा उज्जैनला होते. मग, आता उज्जैनहून चाकू फेकून मारला का, असा संतप्त सवाल माध्यमांशी प्रतिक्रिया देताना वाल्मिक कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे. तसेच, वाल्मिक कराड यांना गोवण्यात येत असून या गुन्ह्यात त्यांचा कसलाही संबंध नसल्याचेही पुण्यातील सीआयडी कार्यालयाबाहेर असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्याने म्हटले आहे. 302 करा, फाशीच द्या असे कुणीही आरोप केल्यावर माणूस भिणारचं ना, म्हणून ते इतके दिवस बाहेर होते. ज्या किशोर फडचा खून झाला, त्या किशोरचा मी भाऊ आहे, त्यामध्ये बबन गितेचं नाव होतं. बबन गिते खरा संघटीत गुन्हेगारीचा बादशहा आहे, असेही पुण्यात आलेल्या एका कार्यकर्त्याने म्हटलं. 


केजमधील न्यायायातही कार्यकर्त्यांची गर्दी


वाल्मिक कराडला आज केजमधील न्यायालयात हजर करण्यात येत असून केजमधील न्यायालयाबाहेरदेखील त्याच्या समर्थकांची मोठी गर्दी जमा झाली होती. आरोपीच्या समर्थनार्थ आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हाकलून लावले आहे. मात्र, काही काळ न्यायालय परिसरातही गाड्या घेऊन कार्यकर्ते जमल्याचं दिसून आलं. दरम्यान, वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केल्यांवर न्यायाधीशांकडून काय आदेश देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


हेही वाचा


चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे